रावेर विधानसभेसाठी माजी आमदार शिरीष चौधरींना काँग्रेसतर्फे उमेदवारी

मुंबई : काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदार संघातून माजी आमदार शिरीष चौधरी यांना अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने चौधरी समर्थथकांमध्ये आनंद पसरला आहे. पक्षाचे जनरल सेक्रेटरी मुकूल वासनिक यांनी रविवारी सायंकाळी 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
अक्कलकुव्यातून पाडवींना उमेदवारी
काँग्रेसने पहिल्या यादीत अक्कलकुवा येथून अॅड.के.सी.पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली तर शहाद्यातून पद्माकर विजयसिंह वळवी तसेच नवापूरातून शिरीष नाईकांना उमेदवारी दिली आहे तर रावेरातून माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
काँग्रेस-राष्ट्रवादी लढवणार 125-125 जगा
काँग्रेसच्या पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान उमेदवारांना संधी देण्यात आली. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, नितीन राऊत, विश्वजीत कदम यांच्या नावांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी केली आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या आहेत, असं शरद पवार यांनी सांगितलं. काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत तेवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नांदेड उत्तरमधून डीपी सावंत यांना उमेदवारी मिळाली आहे.
