भुसावळातील उत्तर भागात पाणीपुरवठा सुरळीत
भुसावळ : शहरातील उत्तर भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आले असून रात्रीतून उर्वरित 170 अश्वशक्तीची मोटार कार्यान्वित होऊन सोमवारपासून पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालिकेने यातील 120 अश्वशक्तीची मोटार रविवारी दुपारी कार्यान्वित करण्यात यश मिळवले आहे. 14 सप्टेंबर रोजी रात्री 500 केव्हीएचा ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाला तर तो रीपेअर होत नसल्याने भाडे तत्वावर ट्रान्सफार्मर आणण्यात आला मात्र शनिवारी या यंत्रणेवरील 120 व 170 अश्वशक्तीच्या दोन्ही मोटारी जळाल्याने पाणीपुरवठा पुन्हा ठप्प झाला होता. दरम्यान, पालिका प्रशासनाने शनिवारपासूनच पाणीपुरवठा योजनेवरील मोटारींची युध्दपातळीवर दुरुस्तीचे केल्यानंतर रविवारी दुपारी 120 अश्वशक्तीची एक मोटार कार्यान्वित होऊन शहरातील यावल, जळगावरोड, सतारे, विठ्ठल मंदिर वॉर्ड, तापीरोडवरील वस्त्यांचा पाणीपुरवठा कार्यान्वित करण्यात आला. दरम्यान, 170 अश्वशक्तीच्या मोटारीची डागडूजी काम प्रगतीपथावर असून सोमवारी सकाळी मोटार कार्यान्वित झाल्यानंतर नाहाटा चौफुलीवरील जलकुंभ भरला जाऊन दक्षिणेकडील सर्व भागांनाही पाणीपुरवठा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.