स्त्री म्हणून स्वतःला कमी न लेखता स्वतःचा अभिमान बाळगा


सुमित्रा गांगुर्डे : प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिर

भुसावळ- व्यक्तिमत्व विकासासाठी फक्त बाह्य रूपाकडे पाहणे योग्य नाही, आपल्याला मिळालेले बाह्यरूप ही निसर्गाने दिलेली देणगी आहे त्याचप्रमाणे प्रजननक्षमता हे सुद्धा स्त्रियांना दिलेली देणगीच आहे. त्याच्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक असून स्त्री म्हणून स्वतःला कमी न लेखता स्वतःचा अभिमान बाळगा, असे आवाहन पोदार इंटरनेशनल स्कूलच्या समुपदेशक डॉ.सुमित्रा गांगुर्डे यांनी येथे केले. शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींना मार्गदर्शनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रसंगी डॉ.गांगुर्डे यांनी विद्यार्थिनींना प्रजनन क्षमतेचे चक्र कसे असते, मासिक पाळी का येते ? याबाबत माहिती दिली.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.शिल्पा पाटील होत्या. डॉ.सुमित्रा गांगुर्डे, आरोग्य केंद्राच्या प्रमुख प्रा.निता चोरडिया आदी उपस्थित होत्या. उपप्राचार्या डॉ.शिल्पा पाटील यांनी आंतरीक सौंदर्य फुलवायचे असेल तर स्वतःचे काम स्वतः केले पाहिजे, आपले सर्वांचे 80 ते 90 टक्के आजार स्वतः ओढवलेले असतात असे सांगून एक समुपदेशक व एक डॉक्टर यांच्यात महत्त्वाचा फरक असून मानसिकता बदला आजार दूर पडतील, असे त्यांनी सांगितले तसेच जीवनात नेहमी हसत राहणे व आनंदी राहायला शिका, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक प्रा.नीता चोरडिया यांनी केले. यशस्वीतेसाठी समिती सदस्य भाग्यश्री भंडारी, दीपाली पाटील यांनी सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा.नीता चोरडिया तर आभार भाग्यश्री भंडारी यांनी केले.


कॉपी करू नका.