सशस्त्र दरोड्याचा डाव उधळला : मध्यप्रदेशातील दोघे ताब्यात
शिरपूर पोलिसांची धाडसी कारवाई : तिघे पसार
शिरपूर : मध्यप्रदेश राज्यातील टोळी शिरपूर शहरात सशस्त्र दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असतनाच शिरपूर शहर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या तर तिघे पसार झाले. बुधवारी मध्यरात्री वरझडी रोडवर शहर पोलिसांनी पथक गस्त घालतांना पाच जणांची टोळी संशयास्पद फिरतांना आढळून आल्याने त्यांना हटकले असता संशयीतत पळू लागल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत बन्सी वैस्ता भिल (27) आणि बिलाल वेस्ता भिल (23, दोघे रा. दिलबानी, ता.कुक्षी, जि.धार मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले तर तिघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. ताब्यात घेतलेल्याची झडती घेतली असता त्यांच्याजवळ धारदार तलवार, लोखंडी कटर, लोखंडी टॉमी, सुती दोरी आणि 100 ग्रॅम मिरची पुड, एक प्लास्टीक गोणी असे दरोडा टाकण्यासाठी साहित्य आढळले. दोघांना अटक करण्यात आली. दरोडेखोरांचे अन्य साथीदार पानसिंग लक्ष्मण भील, सोमनी भील व सोमनीचा एक मित्र असे तिघे पसार असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक किरण बार्हे, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, हवालदार ललित पाटील, भरत चव्हाण, टी.एम.गवळी, अभिजीत ढेपे, महेंद्र सपकाळे, प्रवीण गोसावी, स्वप्निल बांगर, भाऊसाहेब मायचे आदींच्या पथकाने केली. भरत चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार पाच जणांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करीत आहेत.


