तापी पात्रात महिलेचा खून करून मृतदेह फेकला
पोलिसांनी दाखल केला खुनाचा गुन्हा : ओळख पटवण्यासह मारेकर्यांना शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हा
शिंदखेडा : तालुक्यातील टाकरखेडा शिवारातील तापी नदीच्या पात्रात 2 जानेवारी 2021 रोजी अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. मृत महिलेचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर या महिलेचा अज्ञातांनी खून करीत मृतदेह पाण्यात फेकून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी तब्बल सात महिन्यानंतर दोंडाईचा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकर्याविरुद्ध भादंवि कलम 302, 201 अन्वये या वाढीव कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 35 ते 40 वर्ष वयोगटातील या महिलेला गळफास देऊन पाण्यात फेकले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने शवविच्छेदनानंतर मृत महिलेचा व्हिसेरा अधिक तपासणीसाठी नाशिक येथील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महिलेचा कोणीतरी खून केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, अज्ञात महिलेची ओळख पटवण्यासह मारेकर्यांना शोधण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

