नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार : भरत गावीतांसह अनेकांचा उद्या भाजपात प्रवेश

नंदुरबार- महाजनादेश यात्रेनिमित्त शुक्रवारी जिल्ह्यात येत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहादा व नंदुरबार येथे आदिवासी विश्वदिनी सभेत काँग्रेसचे भरत माणिकराव गावित, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील, धडगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय पराडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तिरसिंग वसावे, राष्ट्रवादी शहादा तालुकाध्यक्ष ईश्वर पाटील, प्रकाशे येथील रामचंद्र पाटील यांच्यासह अनेक दिग्गज भाजपात प्रवेश करीत असल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी याबाबत शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार माहिती दिली.
शहिदांच्या भूमीत महाजनादेश यात्रेचा समारोप
शहिदांची भूमी असलेल्या नंदुरबारमध्ये महाजनादेश यात्रेचा शुक्रवारी समारोप होत आहे. तत्पूर्वी शहादा येथे सभा होणार असून त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी बाजार समिती येथे जनादेश यात्रेचा समारोप होईल. प्रसंगी मुख्यमंत्री जनतेला मार्गदर्शन करणार आहेत. याावेळी खासदार डॉ.हीना गावीत, पालकमंत्री जयकुमार रावल, मंत्री गिरीश महाजन, सुरेशसिंह ठाकूर, आ.डॉ. विजयकुमार गावीत, आमदार उदेसिंग पाडवी उपस्थित राहणार आहेत.
