माजी मंत्री एकनाथराव खडसेंवर अन्याय होणार नाही


जलसंपदा गिरीश महाजन : खडसेंना योग्य वाटेल असाच निर्णय पक्ष घेणार

जामनेर : माजी मंत्री एकनाथराव हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून भाजपाची अद्याप यादी यायची आहे त्यामुळे खडसे यांच्यावर अन्याय होणार नाही वा पक्षही त्यांच्यावर अन्याय करणार नाही, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली. सायंकाळपर्यंत भाजपाची निश्‍चित यादी येईल व खडसे यांना योग्य वाटेल असाच निर्णय यातून जाहीर होईल, असे महाजन म्हणाले. तिकीट वाटपाच्या विषयावरून खडसे नाराज नाहीत, असेदेखील महाजन म्हणाले.

शरद पवारांचे वक्तव्य तेल टाकण्याचे
राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी खडसे गेल्या तीन महिन्यांपासून संपर्कात असल्याचे विधान ठाण्यात केल्यानंतर महाजन यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, राष्ट्रवादीला आता काम उरलेले नाही त्यामुळे आमच्यात तेल टाकण्याचे काम ते करीत आहेत. राष्ट्रवादीकडे मुळात उमेदवार नाहीत कारण सर्व उमेदवार आता आमच्याकडे आले आहेत शिवाय याबाबत खडसेंनी स्पष्टपणे निवेदन केले आहे, तीन महिनेच काय वर्षभरापासून राष्ट्रवादीशी संपर्कात ते नाहीत शिवाय मीदेखील त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यावेळी देखील खडसेंनी राष्ट्रवादीशी संपर्कात नसल्याचे सांगितले आहेत. अजित पवार खडसेंच्या भेटीसाठी आल्याच्या वृत्तावर महाजन यांनी अजितदादा आलेच नाहीत, असे महाजन यांनी सांगत जर ते आले असते तर कुठे अंडरग्राऊंड झाले? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित करीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला अवघ्या 30 जागांपर्यंत यश मिळू शकते, असा दावाही महाजन यांनी केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !