आयशर उलटताच मासे पळविण्यासाठी नागरीकांची उडाली झुंबड
शिपूर तालुक्यातील दहिवदजवळ वाहने उलटले : पोलिसांची वेळीच धाव
शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडून इंदूरकडे जिवंत मासे घेऊन जाणारी भरधाव आयशर शनिवारी पहाटे चोपडा फाट्यावर उलटली. यावेळी जिवंत मासे रस्त्यावर आणि शेतात पडल्याने काही नागरीकांनी मासे गोळा करण्यासाठी मोठी गर्दी केली मात्र पोलीस घटनास्थळी तत्काळ पोहचल्याने मोठी आर्थिक हानी टळली.
नियंत्रण सुटल्याने अपघात
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मुंबई येथून मध्यप्रदेश राज्यातील इंदूर येथे जिवंत मासे घेऊन जाणारी आयशर (क्रमांक एम.एच.43 बी.जी.6399) ही भरधाव वेगात जात असताना तालुक्यातील दहिवद गावाजवळ चोपडा फाट्यावर असलेले गतिरोधक चालक अल्लाउद्दीन रफतानच्या लक्षात न आल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. अपघातामुळे वाहनातील जिवंत मासे रस्त्यावर आणि शेतात फेकले गेले. रस्त्यावर पडलेले मासे पाहून येणार्या जाणार्या नागरीकांच्या लक्षात आल्याने त्यांनी मासे गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली. अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना मिळाल्याने तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले. पलटी झालेल्या आयशरला पुन्हा उचलून रस्त्यावर आणण्यात आले. रस्त्याच्या बाजूला पडलेले मासे गोळा करून ते आयशरमध्ये भरण्यात आले व वाहन पुढे रवाना करण्यात आले.



