शिरपूरात पेट्रोल पंप लुटण्याचा डाव फसला : दरोडेखोरांच्या हल्ल्यात चालक जखमी, वाहनाच्या काचा फुटल्या
शिरपूर : तोंडाला रूमाल व अंगात बनियन घातलेल्या आठ ते दहा दरोडेखोरोना मुंबई-आग्रा महामार्गावरील दहिवद फाट्यानजीकच्या स्वामी समर्थ पेट्रोल पंपावर बुधवारी पहाटे दरोडा टाकण्याचा प्रयत्न असफल ठरला तर दरोडेखोरांच्या दगडफेकीत ट्रक चालक जखमी झाला असून वाहनाच्या काचा फुटल्या आहेत.
दरोड्याचा प्रयत्न फसला
दहिवद फाट्याजवळील मुंबई-आग्रा महामार्ग लगत असलेला स्वामी समर्थ पेट्रोल पंप आहे. बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास 8 ते 10 दरोडेखोरांनी चाल करून पंपावरील कॅबीनचा काचा फोडून रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला मात्र लोखंडी कॅबीन असल्याने झोपलेल्या दोघा कर्मचार्यांनी दरवाजा उघडला नाही. दरोडेखोरांनी किमान 15 ते 20 मिनिटे कॅबीनवर हल्ला केला. मात्र प्रतिसाद काहीच मिळाला नाही़ त्याचवेळी पेट्रोल पंपासमोर मालट्रक (क्रमांक एम.एच.04 जे.के.8312) ही पार्किंगमध्ये उभी होती. चालक राजेश चौहान व सहचालक प्रेमजीत चौहान हे दोघे गाडीच्या कॅबीनमध्येच झोपले होते. त्यावेळी चालक राजेश चौहान यास झोपेतून अचानक जाग आली, त्यामुळे त्याने गाडीच्या कॅबीनमधील लाईट लावला़ हे दरोडेखोरांच्या लक्षात येताच त्यांनी वाहनावर देखील दगडफेक करीत दोन्ही बाजूच्या काचा फोडल्या. त्यानंतर दरोडेखोरांनी चालकावर चाकूचा हल्ला केल्यामुळे त्यास डाव्या बाजूस कंमरेजवळ मोठी दुखापती झाली. त्याचवेळी सहचालकाला जाग आल्यामुळे त्याने तो प्रकार पाहताच त्याने गाडीतील लोखंडी टॅमी काढत दरोडेखोरांवर चाल केली, ते पाहून दरोडेखोर पळून जाण्यास यशस्वी झाले. काही दरोडेखोर पेट्रोल पंपाच्या पाठीमागील शेतातून तर काही समोरील हायवेने पसार झालेत. दरोडेखोर 25 ते 30 वयोगटातील असून त्यांनी तोंडाला रूमाल व अंगात फक्त बनियन होते.


