यावल नगरपरीषद उपनगराध्यक्षपदी अभिमन्यु चौधरी यांची बिनविरोध निवड
यावल : यावल नगरपरीषद उपनगराध्यक्षपदी अभिमन्यु चौधरी यांची शुक्रवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्षा देवयानी महाजन यांनी अंतर्गत ठरलेल्या विषयानुसार पदाचा राजीनामा दिल्याने रीक्त पदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. शुक्रवार, 24 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष नौशाद तडवी यांच्या उपस्थित घेण्यात आलेल्या ऑनलाईन बैठकीत नगरसेवक अभिमन्यू (हेंद्री ) चौधरी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
18 नगरसेवकांचा ऑनलाईन बैठकीत सहभाग
या बैठकीत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, माजी प्रभारी नगराध्यक्ष व नगरसेवक राकेश कोलते, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक प्रा.मुकेश येवले, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक शेख असलम शेख नबी, नगरसेवक समीर शेख मोमीन, नगरसेवक मनोहर सोनवणे, नगरसेविका रेखा चौधरी, देवयानी महाजन, शीला सोनवणे, नगरसेवक दीपक बेहडे, सैय्यद युनूस सैय्यद युसूफ यांच्यासह एकुण 18 नगरसेवक यांनी या ऑनलाईन सभेत सहभाग नोंदविला. दरम्यान या संपूर्ण उपनगराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत नगर परीषदेचे कार्यालयीन अधिक्षक योगेश मदने, स्वच्छता निरीक्षक दिलीप गायकवाड, स्वप्नील म्हस्के यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचार्यांनी भाग घेतला.








