बलवान असल्यानेच आघाडीच्या पहिल्या बैठकीत मिळाले तिकीट


जगन सोनवणेंचा दावा : विद्यमान आमदार संजय सावकारे व माजी आमदार संतोष चौधरींच्या कार्यपद्धत्तीवर केली टीका

भुसावळ : बलवान असल्यानेच आघाडीच्या पहिल्याच बैठकीत मला तिकीट मिळाले मात्र माजी आमदार संतोष चौधरींनी पक्षाला न विचारता परस्पर तिकीट जाहीर केले त्यामुळे राष्ट्रवादीचे ते नेते नाही शिवाय पक्षश्रेष्ठी त्यांच्या फोनला प्रतिसाद देत नसल्याची टीका राष्ट्रवादीचे उमेदवार व माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनी येथे केली. जामनेर रोडवरील चौधरी मंगल कार्यालयात त्यांनी रविवारी दुपारी दोन वाजता पत्रकार परीषद घेतली. चौधरी यांनी शनिवारी सोनवणे यांचे डिपॉजिट जप्त करणार असल्याचे विधान केल्यानंतर सोनवणे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, आजी-माजी आमदारांना आता जनता कंटाळली असून त्यांची छुपी युती आहे हे जनतेला ठावूक झाले असून आता परीवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही.

पहिल्याच बैठकीत तिकीट -सोनवणे
सोनवणे म्हणाले की, अजित पवारांसह पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत पवारांनी आपल्याला बलवान उमेदवार म्हणत पहिल्याच बैठकीत तिकीट दिले शिवाय कवाडे साहेबांनी आघाडी तोडण्याची भाषा केली नसल्याचे त्यांनी सांगत मला उमेदवारी जाहिर झाल्यानंतर चौधरींनी मग दहा दिवस काय केले? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. आमदार संजय सावकारेंसह चौधरींनी जाहीर केलेल्या उमेदवाराची डिपॉजिट आपण जप्त करू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

बड्या नेत्यांच्या सभा होणार
राष्ट्रवादीचे पदाधिकारी चौधरींशी संबंधित असल्याने ते पत्रकार परीषदेला आले नाहीत मात्र राज्यात आमची आघाडी असल्याने शरद पवार, अजित पवार, अशोक चव्हाण, प्रा.जोगेंद्र कववाडे, राजू शेट्टी, अबू आझमी, जितेंद्र आव्हाड आदी बड्या नेत्यांच्या सभा होतील, असेही सोनवणे म्हणाले. पत्नी पुष्पा सोनवणे यांनी जनहितासाठी सभागृहात राजीनामा दिला होता मात्र चौधरींनीच तो मागे घ्यायला लावला, असा दावाही त्यांनी केला. चौधरींचा मी राजकीय गुरू असल्याने ते आपल्याला सर म्हणतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

आमदारांशी गळाभेट प्रेमातून : त्यांचे डिपॉजिट जप्त होणार
उमेदवारी अर्ज भरताना आमदार सावकारे यांच्याशी घेतलेली गळाभेट हे त्यांच्यावरील प्रेम आहे, ते माझे शत्रू नाहीत, माणुसकी नावाचीही गोष्ट असते, संतोष चौधरींवरही माझे प्रेम आहे, उद्या नाथाभाऊ शहरात आल्यानंतर त्यांचेही आपण आशीर्वाद घेतो, असे स्पष्टीकरण त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरादरम्यान दिले. आमदार संजय सावकारे यांचे डिपॉजिट यावेळी आपण जप्त करू, जनता त्यांच्या विरोधात गेली आहे, शहर व तालुक्याचा विकास झाला नसल्याची टिका त्यांनी केली. 15 दिवसात चमत्कार करणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परीषदेला नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे, हरीष सुरवाडे, राकेश बग्गन आदींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !