केमिकल टाकून सोनसाखळी चोरणारी बोदवडची तरुणी पोलिसांच्या जाळ्यात
जळगावातील वकील तरुणीची सोनसाखळी लांबवताना अटक : अटकेतील तरुणी बीबीएम शाखेची विद्यार्थिनी
जळगाव : जळगावातील फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या व व्यवसायाने वकील असलेल्या तरुणीच्या मानेवर केमिकल टाकून सोनसाखळी लांबवणार्या बोदवडमधील हर्षदा किशोर महाजन (19, रा.बोदवड) या तरुणीस पोलिसांनी अटक केली असून ही जळगाव विद्यापीठात बीबीएमच्या दुसर्या वर्षाचे शिक्षण घेत असून वस्तीगृहात शिक्षण घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे अटकेतील तरुणी ही बोदवडमधील सधन शेतकर्याची कन्या असून तिच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सतर्कतेने तरुणी जाळ्यात
शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील फुले मार्केट परीसरात जिल्हा न्यायालयातील अॅड.पूजा ओमप्रकाश व्यास (बालाजीपेठ, जळगाव) या रविवारी दुपारी बहिण आरतीसोबत खरेदीसाठी आल्या असताना नूतन ड्रायफूट दुकानासमोरुन पायी चालत असताना तोंडाला स्कार्प बांधून आलेल्या हर्षदा महाजन या तरुणीने दोघांच्या मानेवर केमिकल टाकले व आग होवू लागताच हर्षदाने अॅड.पूजा यांच्या गळ्यातील चैन तोडून पळ काढला. या प्रकारानंतर आरडाओरड झाल्याने शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, सुनील पाटील, भरत ठाकरे, सुधीर सावळे, प्रनेश ठाकूर, रविंद्र साबळे, नवजीत चौधरी यांनी धाव पळणार्या हर्षदाला ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात आणले. तिच्या ताब्यातून केमिकल असलेली बाटली व चैन जप्त करण्यात आली. हर्षदाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.



