दहिवदजवळ स्पिरीटची हेराफेरी : दोन टँकर जप्त
शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील दहिवद गावाजवळील मरावी उपकेंद्रासमोरील एका हॉटेलच्या प्रांगणात स्पिरीटची हेराफेरी करतांना 2 टँकर पोलिसांनी जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवार, 8 रोजी दुपारी 3.30 ते 4 वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. आय.जी.पथकाचे प्रमुख निरीक्षक हेमंत पाटील, शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख व सांगवी पोलीस ठाण्याचे सहा.सुरेश शिरसाठ व पोलिस पथकाने हा छापा टाकला. इंदौरकडून येणारे स्पिरीटने भरलेले टँकर मरावी उपकेंद्राजवळील हॉटेल करणीच्या प्रांगणात उभे होते़ काही वेळानंतर एक जीप येवून हॉटेलच्या पाठीमागे गेली. त्यानंतर ते दोघे टँकर सुध्दा गेलेत़ टँकरमधून स्पिरीटची हेराफेरी होत असतांना अचानक पोलिसांनी छापा टाकला़ त्यावेळी काही संशयित पसार झाले, तर 2 जणांना ताब्यात घेण्यात आले़ घटनास्थळी हेरोफेरी करण्यासाठी लागणारे रिकामे प्लॅस्टिक ड्रम, स्पिरीट खाली करण्यासाठी लागणारी नळी आदी साहित्य जप्त करण्यात आले़








