दसर्‍याच्या मुहूर्तावर सेना-भाजपा युतीच्या घातक शक्तीचे निर्मूलन करा


पारोळ्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांचे शरसंधान

पारोळा : राज्यातील सत्तेत भाजप-शिवसेना युतीची घातक राजकीय शक्ती असून या शक्तीचे दसर्‍याच्या मुहूर्तावर निर्मूलन करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी किसान महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या जाहीर सभेत केले. दसर्‍याच्या दिवशी आपण शस्त्राची पूजा करतो आणि या शस्त्राच्या माध्यमातून दृष्ट शक्तीचा नायनाट करतो, असेही पवार म्हणाले. व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अरुणभाई गुजराथी आदी उपस्थित होते.

ईडीची भीती घालून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
शरद पवार म्हणाले की, विरोधी पक्षाला संपवण्याचे काम आज सत्ताधारी करत आहेत. ईडीची भीती घालून विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सुरू आहे. सरकार उलथवून टाकण्याची वेळ आता आली असून महागाईचे प्रमाण दिवसागणिक वाढत असताना सरकार कोणतीही भूमिका घेत नाही, असे सांगून ते म्हणाले की, सरसकट कर्जमाफी देण्याची केवळ घोषणा हे सरकार करत आले पण प्रत्यक्षात शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळालेली नाही. उद्या सत्तेत आल्यास सरसकट कर्जमाफी देण्याकडे आमचे प्राधान्य असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.



कांदा निर्यातीवर बंदीने शेतकर्‍यांचे नुकसान
शरद पवार म्हणाले की, कांद्याच्या भाव वाढीमुळे शेतकर्‍यांना दोन पैसे मिळू लागले होते. पण केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली. शेतकर्‍यांने कांदा चाळीत किती आणि घरात किती कांदा किती ठेवावा, याबाबत अट घातली. या मुळे कांदा पिकविणार्‍या शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. कांद्याचे भाव वाढलेत की सरकार हवालदिल होते पण शेतकरी आत्महत्या होते तेव्हा शासनकर्ते हवालदिल का होत नाही?असा प्रश्न त्यांनी केला. या सरकारला घरी पाठवा असे आवाहन त्यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !