जळगाव शहर पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍याचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू


जळगाव : जळगाव शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी महेंद्र सीताराम उमाळे (30, रा.चंदू अण्णा नगर, निमखेडी शिवार) या पोलीस कर्मचार्‍याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी मध्यरेल्वेच्या लासलगाव रेल्वे स्थानकावर घडली. नाशिक येथे राष्ट्रपती बंदोबस्तासाठी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

तोल गेल्याने ओढवला मृत्यू
नाशिक येथे राष्ट्रपती दौर्‍यावर असल्याने त्यासाठी असलेल्या बंदोबस्तासाठी महेंद्र उमाळे हे दुपारी नाशिककडे निघाले. जळगावहून ते भुसावळ येथे गेले. तेथून गोदान एक्स्प्रेसमध्ये बसून नाशिकला जात असताना एक वाजेदरम्यान लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ तोल जावून उमाळे खाली पडले. यात गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे ट्रॅकवरील गँगमन यांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. उमाळे याच्याकडे असलेल्या आयकार्डवरुन त्यांची ओळख पटली. यानंतर जळगाव शहर पोलीस ठाण्यात प्रकाराबाबत माहिती देण्यात आली. यानंतर कुटुंबियांना माहिती दिली. अवघ्या तीन ते चार तासात त्याच्या मृत्यूची जळगावात पोहचली. यानुसार त्याचा भाऊ व काही मित्र नाशिककडे रवाना झाले होते. माहिती मिळताच उमाळे यांचे वडील यांनी शहर पोलीस ठाणे गाठले. मानसिक धक्का बसेल म्हणून वडीलांना मृत्यू नव्हे तर केवळ अपघात झाल्याचे सांगण्यात आले होते. ठाणे येथे पोलीस दलात कार्यरत रमाकांत साळुंखे याने मित्र महेंद्रला 11.30 वाजता फोन केला होता. यावेळी रेल्वेत बसला असून नाशिकला बंदोबस्तासाठी जात असल्याचे त्याने सांगितले होते. यानंतर दीड वाजेच्या सुमारास रमाकांतला त्याच्या मृत्यूचे कळाले. मृत महेंद्रच्या पश्‍चात्त आई, सिंधूबाई, वडील, भाऊ राहूल , पत्नी प्रतिभा व दोन मुले असा परीवार आहे. वडील सीताराम उमाळे यांचे गोलाणी मार्केटमध्ये घड्यात रीपेअरींगचे काम करतात. तर लहान भाऊ राहूल हा दुकानावर काम करतो. महेंद्रच्या मृत्यूने अक्षय (4 वर्ष) व आरुष (वय 6 महिने) हे दोन्ही चिमुकल्याच पितृछत्र हरपल आहे. सायंकाळी मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह जळगावला हलविण्यात आला. या घटनेने जिल्हा पोलिस दलातील कर्मचार्‍यांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !