भुसावळातील हत्याकांडाची मुख्यमंत्र्यांकडून गांभीर्याने दखल
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भुसावळात माहिती
भुसावळ : भुसावळातील पाच जणांच्या अमानुष हत्याकांड ही गंभीर घटना असून या घटनेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी पोलिस महासंचालक तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांशी या संदर्भात दोन ते तीन वेळा चर्चा केली आहे शिवाय आपणदेखील पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली. भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या जामनरे रोडवरील प्रचार कार्यालयात गुरूवारी रात्री त्यांनी भेट देवून आढावा घेतला. याप्रसंगी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी माहिती दिली.
मध्यप्रदेशातून शस्त्र तस्करी
भुसावळात रविवारी झालेल्या हत्याकांडात पाच जणांचा बळी गेला तर गुरुवारीदेखील दीपनगरातील ठेेकेदारावर गोळीबाराचा प्रयत्न झाल्याने भुसावळातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे या संदर्भात काय सांगाल, असा प्रश्न विचारला असता मंत्री महाजन म्हणाले की, कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे किंवा नाही हे म्हणण्यापेक्षा शहरात झालेले पाच लोकांचे हत्याकांड ही गंभीर घटना आहे. या संदर्भात आपण पोलिस अधीक्षकांशी चर्चा करून शहरात मोठे कोम्बिंग ऑपरेशन राबवत कुणाच्या घरात अवैध शस्त्र आहे वा नाही याची तपासणी करण्याची सूचना केली असल्याचे ते म्हणाले. शिवाय नजीकच्या मध्यप्रदेशातू पाच ते दहा हजारात गावठी कट्टे मिळत असल्यामुळे शहरात गावठी कट्टे मोठ्या प्रमाणात आणल्याचे दिसून येते, असेही ते म्हणाले.

