सोशल मिडीयावर अफवा पसरणार्यांवर दाखल होणार गुन्हे
डीवायएसपी गजानन राठोड : भुसावळकरांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
भुसावळ : भुसावळ शहर व तालुका पोलिस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांपासून काही अप्रिय घटना घडल्या असून या घटना निंदणीय आहेत मात्र या घटनांसंदर्भात सोशल मिडीयावर विविध फोटो व माहिती टाकून नागरीकांमध्ये अफवा व भीती पसरवण्याचे काम काही लोक करीत असून त्यांच्यावर पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी दिली. पोलिस त्यांचे काम योग्य रीतीने करत असल्याने नागरीकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सोशल मिडीयावर पोलिसांचे बारीक लक्ष
उपअधीक्षक पवार म्हणाले की, नागरीकांनी दहशतीखाली राहण्याचे कारण नाही. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आधी शहानिशा करावी. विषेशतः सोशल मिडीयावर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. आपल्या शहराचे वातावरण कलुषित होणार नाही याची जबाबदारी प्रत्येक नागरीकांची आहे. अनुचित फोटो वा मेसेज व्हायरल करू नये, भुसावळ शहर सुरक्षित होते व या पुढेही सुरक्षितच राहील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. यावेळी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभारे व शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे उपस्थित होते.

