जळगावात 13 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा
भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा : भुसावळातील भाजपा पदाधिकार्यांनी केले सभेचे नियोजन
भुसावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा जळगावात 13 रोजी होत आहे. खान्देशातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे. दरम्यान, याचदिवशी पंतप्रधान विदर्भातील भंडारा तसेच साकोली येथे सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पंतप्रधानांच्या सभेसाठी भुसावळातील भाजपा पदाधिकार्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्यासंदर्भात नियोजन बैठक घेतली.
पंतप्रधान मोंदीच्या एकाच दिवसात तीन सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवार, 13 रोजी एकाच दिवशी तीन सभा घेणार आहे. पहिली सभा जळगावात होणार असून दुपारी ही सभा होणार असल्याची शक्यता आहे. कुसुंबा शिवारातील विमानतळासमोरील मैदानावर ही सभा होणार असल्याची शक्यता आहे. याच दिवशी पंतप्रधान विदर्भातील भंडारा तसेच साकोली येथे सभा घेणार आहेत.
भुसावळातून हजारो कार्यकर्ते जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी भुसावळातील भाजपा पदाधिकार्यांची महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली. बैठकीला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणी संघटक सहसचिव व्ही.सतीश यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत भुसावळ विधानसभा मतदार संघाचा प्रचाराचा कार्यकर्त्यांकडून आढावा घेण्यात आला.
यांची बैठकीला होती उपस्थिती
भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, पंचायत सभापती प्रीती पाटील, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, भालचंद्र पाटील, वसंत पाटील, शैलेजा पाटील, अलका शेळके, दिनेश नेमाडे, सर्व प्रचार समिती सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

