जळगावात पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी जय्यत तयारी
सभास्थळाचे इनकॅमेरा सपाटीकरण : विमानतळ ते सभा स्थळापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू
जळगाव : भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवार, 13 रोजी जळगाव विमान तळासमोरील मोकळ्या जागेत होणार्या सभेसाठी तयारीला वेग आला आहे. विमानतळाच्या बाहेर महामार्गालगतच 200 मीटर आत ही सभा होत असून, विमानतळ ते सभा स्थळापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. रस्त्यातील झुडपे तोडण्यात आली असून, खड्डेही बुजविण्यात आले आहेत. मोदी यांच्या सुरक्षिततेसाठी विमानतळावर आणि सभास्थळी एनएसजीच्या कमाडोंचे विशेष पथक शस्त्रासह तैनात करण्यात आले आहे. सभास्थळाच्या मैदानाचे इनकॅमेरा सपाटीकरण सुरू असून विमान तळासमोरील 100 एकर जागेवर सकाळी साडेदहा वाजता ही सभा होत आहे.
एनएसजी कमांडो दाखल
सभास्थळाच्या मैदानाचे गेल्या तीन दिवसांपासून जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरण करण्यात येत आहे. ठिकठिकाणची काटेरी झाडे व झुडपे तोडण्यात येत आहेत. एनएसजीचे कमांडो तीन दिवसापासूनच शहरात दाखल झाले आहेत. एनएसजीच्या वरीष्ठ अधिकार्यांनी सुरक्षिततेचा आढावा घेऊन, विमानतळ आणि सभास्थळ ताब्यात घेतले आहेत.

