बालिकेचे अपहरण करून विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस तीन वर्ष शिक्षा
भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निकाल : सहा हजारांचा दंडही सुनावला
भुसावळ : आजीसोबत रेल्वेने प्रवास करण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन तरुणीला चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून उचलून नेत तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना 2016 मध्ये घडली होती. या प्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलिसात आरोपी सुनील संभाजी महाजन (पिंपरूड, ता.भडगाव) याच्याविरुद्ध पोस्कोसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्या.भन्साली यांनी तीन वर्ष सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पीडीतेची साक्ष ठरली महत्वाची
चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून 2016 मध्ये अल्पवयीन बालिकेचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी सुनील संभाजी महाजन (पिंपरूड, ता.भडगाव) विरुद्ध चाळीसगाव लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालल्यानंतर सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडीत बालिकेची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आरापीस तीन वर्ष सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. शुक्रवारी हा निकाल जाहीर झाला. सरकार पक्षातर्फे अॅड.पी.बी.भोंबे तर आरोपीतर्फे अॅड.राकेश यादव यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून गणेश शिरसाठी यांनी काम पाहिले.

