राज्यावर लॉकडाऊन संकट : आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पष्टच म्हणाले…!


मुंबई : राज्यात सातत्याने वाढणारी रुग्णांची संख्या पाहता राज्य पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा रंगत आहेत शिवाय यानुषंगाने प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले असताना लॉकडाऊनबाबत औरंगाबादमध्ये आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मोठे विधान केले आहे. टोपे म्हणाले की, लॉकडाऊनबाबत सध्या कोणतीही चर्चा नाही पण याच गतीने रुग्णसंख्या वाढत राहिली तर पर्याय नाही. काही वेगळे निर्णय घ्यावे लागतील, असे राजेश टोपे म्हणाले. राज्यातील निर्बंध आणखी कठोर करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले.

तूर्त लॉकडाऊन नाहीच !
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आम्ही अगोदर देखील म्हणालो आहोत, लॉकडाउन लॉकडाउन असं जरी कोणी म्हणत असेल तरी तो आत्ता नाहीच. सध्या अजिबात तो विषय नाही. कारण, काल मुख्यमंत्र्यांच्या प्रदीर्घ अशा आरोग्य विभाग व टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीत लॉकडाउनची कुठेही चर्चा नाही. निर्बंध जरूर वाढवले पाहिजे आणि लॉकडाउनची भाषा आम्ही त्याचवेळी केली की, ज्यावेळी 700 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर होईल, त्या दिवशी ऑटोमोडमध्ये लॉकडाउन होऊन जाईल. अशा पद्धतीने ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज इतक्या लवकर लॉकडाउनचा काही विषय नाही. नक्कीच संख्या वाढतेय हे मात्र तेवढच खरं आहे



लॉकडाऊनचा परीणाम हा थेट अर्थकारणावर
लॉकडाऊनचा परीणाम हा थेट अर्थकारणावर होतो. गरीब माणूस, हातावर पोट असणार्‍यावर होतो. लोकांनी पहिल्या दुसर्‍या लॉकडाउनची झळ सोसलेली आहे. निर्बंधांच्या बाबतीत नक्कीच कठोर कार्यवाही करण्याच काम सुरू झालेलं आहे. बेड्सची उपलब्धता आणि ऑक्सिजनचा वापर या दोन गोष्टींवरून पुढील निर्णय घेतले जातील, असेही टोपेंनी यावेळी सांगितलं.

निर्णयाची कठोर अंमलबजावणी होणार
कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जे निर्बंध लागू केलेले आहेत. त्याची कठोर पद्धतीने अंमलबजावणी करणे हा एक शासनासमोरचा आव्हानात्मक विषय नक्कीच आहे. त्यामुळे कोविड अनुषंगिक वर्तवणुक असो किंवा मग आता जे काही निर्बंध लागू केलेले आहेत, ते सगळे लागू करण्याचा विषय. संक्रमण होऊ नये किंवा संसर्ग वाढू नये या दृष्टीकोनातून उपाय करणं हे शासनाचं प्रथम प्राधान्य आहे. अशी माहिती देखील यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !