मतदान करणार्यांना नेत्र तपासणीच्या फी मध्ये 50 टक्के सवलत
वासुदेव नेत्रालयाचे 21 ते 27 ऑक्टोबरदरम्यान मतदार जनजागृती अभियान
भुसावळ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे नेत्ररोग तज्ञ डॉ.रेणुका पाटील आणि डॉ.नितु पाटील हे मतदार जनजागृती अभियान रावबणार आहेत. मतदान करून आलेल्या मतदारांना आठवडाभर नेत्रतपासणी फी मध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. 21 ऑक्टोबरला मतदान केल्यानंतर हे अभियान 21 ते 27 ऑक्टोबर वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयात चालणार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी शंभर टक्के मतदान होणे गरजेचे आहे.शासन, प्रशासन, सेवाभावी सामाजिक संस्था मतदान जनजागृतीसाठी प्रयत्न करत असतात. या लोकशाही उत्सवासाठी आपला देखील हातभार लागावा म्हणून डॉ.पाटील दाम्पत्य यांनी हा उपक्रम आयोजीत केला आहे. मतदारांनी मतदान केल्यावर पुरावा म्हणून केवळ बोटावरील शाई दाखवल्यास सदर सवलतीचा फायदा घेता येणार आहे. भुसावळ, मुक्ताईनगर, यावल-रावेर विधानसभेतील मतदारांना याचा फायदा होणार आहे.
सशक्त लोकशाहीसाठी मतदान आवश्यक
प्रत्येक नागरीकाने मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे लोकशाही बळकट करणे होय. मतदान हा लोकशाहीचा सर्वोत्तम उत्सव आहे. प्रत्येक नागरीकाने मतदान करण्यासाठी प्रेरीत व्हावे यासाठी 21 ते 27 ऑक्टोबर या काळात नेत्र तपासणी शुल्कात 50 टक्के सुट दिली जाणार असल्याचे डॉ.नि.तु.पाटील यांनी सांगितले.

