यावल शहरात विविध विकासकामांचे भूमिपूजन
यावल : शहरातील न्यू व्यास नगर भागातील खुल्या जागेवर उद्यान निर्मिती, जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम व चिल्ड्रन पार्क या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह नागरीकांची उपस्थिती होती.
74 लाख रुपये खर्चातून कामे
यावल नगरपरीषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून न्यू व्यास नगर भागातील सुमारे 20 हजार चौरस फूट जागेवर कंपाउंड वॉल, ओपन जीम, जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्रन पार्क व उद्यानाची निर्मिती केली जात आहे. या कामासाठी 74 लक्ष रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. या कामाचा शुभारंभ परीसरातील नागरीकांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पालिकेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, गणेश महाजन, इजाज देशमुख, उदय पाटील, ज्येष्ठ नागरीक तुळशीराम खेडकर, घनश्याम बावस्कर, डॉ.चंद्रकांत चौधरी, गोपाळ बिरारी, श्यामराव बारी, जलील पिंजारी, सुभाष कोळी, खेमचंद खाचणे, मयुर खरचे, माजी सैनिक रघुनाथ बैरागी, जुलाल इंगळे, नरेंद्र तायडे, योगेश वाणी उपस्थित होते.
वचनपूर्तीचा आनंद : अतुल पाटील
न्यू व्यास नगर भागातील नागरीकांची गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात उद्यान निर्मितीची मागणी होती. ती मागणी मी पूर्ण करणार, असे वचन दिले होते. वचनपूर्ती होत असल्याने मनस्वी आनंद आहे. या कामांमुळे परीसरातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना सुविधा मिळणार आहेत. ओपन जिम, जॉगिंग ट्रॅकमुळे व्यायामाची सुविधा उपलब्ध होणार आहे. चिल्ड्रन पार्क मुळे लहान मुलांना सुविधा उपलब्ध होणार आहे. उद्यान निर्मितीमुळे परीसरातील सौंदर्यात भर पडणार असून काम वेळेत पूर्ण व्हावे या दृष्टीने कंत्राटदारास सूचना दिल्या आहेत.


