केळीवरील करप्याचा तिढा सोडवा : खासदार रक्षा खडसेंचे कृषी मंत्र्यांना साकडे
मुक्ताईनगर : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शंभर टक्के अनुदान मिळावे तसेच केळी पीक विम्याच्या अडचणी व केळी पिकाच्या कमी भावाबाबत जळगावात अथवा मंत्रालयात बैठक आयोजित करावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांना पत्राद्वारे केली आहे.
पाच वर्षांपासून अनुदान बंद
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये 2010-11 ते 2016-17 या 7 ते 8 वर्षामध्ये केळी करपा योजना राबविण्यात आली त्यामुळे जिल्ह्यातील केळीवर नेहमी येणारा करपा हा रोग बर्याच प्रमाणात नियंत्रणात आला होता मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून ही योजना कृषी विभागामार्फत शासकीय अनुदानावर राबविण्याचे बंद केल्यामुळे जिल्ह्यामध्ये केळीवरील करपा रोग वाढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. केळी करपा रोग नियंत्रणात आणण्यासाठी ज्या निविष्ठांचा वापर करण्यात येत होता, त्या सर्व निविष्ठा शेतकर्यांना एका ठिकाणी उपलब्ध होत नाहीत त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे तसेच हवामानावर आधारीत केळी पीक विमा योजनेबद्दल जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या अडचणी असून त्यासोबतच केळीला भाव दिवसाकमी कमी होत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आहेत. या सर्व प्रश्नांवर चर्चा करून सोडवणू करण्यासाठी जळगाव अथवा मंत्रालयात बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी खासदारांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांना पत्राद्वारे केली आहे.


