महिंदळे गावातील शेतकर्यांचे पिक विम्याचे पैसे मिळण्यासाठी कृषी अधिकार्यांना साकडे
महिंदळे, ता.भडगाव : महिंदळे येथील अनेक शेतकर्यांनी 2020-21 या खरीप हंगामात कपाशी पिकाचा विमा काढला होता. पंचनामा करून दोन महिने झाले तरीही विमा कंपनी पैसे देत नसल्यामुळे शेतकर्यांनी भडगाव कृषी अधिकारी बी. बी. गोरडे यांना निवेदन देत साकडे घातले व पैसे लवकर न दिल्यास उपोषण छेडण्याचा इशारा दिला.
पंचनामा होवूनही शेतकर्यांना मोबदला मिळेना
यावर्षी अती पावसामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकर्यांना उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. शासनाच्या निकषानुसार यावर्षी पिक विमा मंजूर झाला आहे. या नुकसान ग्रस्त पिकांचा विमा प्रतिनिधी व कृषी विभागाचे कर्मचार्यांनी पंचनामा करून दोन ते तीन महिने झाले. मात्र अजून शेतकर्यांना पिक विम्याचा मोबदला देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करत आहे व विमा प्रतिनिधी शेतकर्यांना उडवा-उडवीचे उत्तर देत आहेत. त्यामुळे महिंदळे येथील 35 शेतकर्यांनी भडगाव कृषी अधिकारी व भडगाव तहसीलदार यांना निवेदनाद्वारे पैसे मिळण्यासाठी साकडे घातले. त्वरीत विमा रक्कम न मिळाल्यास आम्ही उपोषण करू, असा इशाराही दिला. यावेळी गोपीचंद देवरे, अशोक भदाणे आनंदा पाटील, राजेंद्र देसले, भैया साळुंखे, समाधान राजपूत देविदास देवरे, चुडामण देवरे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




