भुसावळात भरदिवसा सिनेस्टाईल घरफोडी : लाखोंचा ऐवज लंपास
नूतन निरीक्षकांना चोरट्यांची कडक सलामी : रहिवाशांमध्ये घबराट
भुसावळ : एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेशी घटना शहरात घडली. चारचाकीतून आलेल्या हायप्रोफाईल चोरट्यांनी अवघ्या 20 मिनिटात भरदिवसा अपार्टमेंटमधील बंद घर फोडून दोन लाखांच्या रोकडसह लाखोंच्या दागिण्यांवर डल्ला मारला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाजवळील शिवपूर-कन्हाळा रस्त्यावरील समर्थ अपार्टमेंट घडली. चोरीनंतर चोरटे चारचाकीतून पसार झाले. दरम्यान, बाजारपेठ पोलिस ठाण्यात एका दिवसांपूर्वीच निरीक्षक राहुल गायकवाड रूजू झाले असून चोरट्यांनी त्यांना कडक सलामी दिल्याचे बोलले जात आहे.
भर दिवसा पडलेल्या घरफोडीने खळबळ
बिल्डींग मटेरीयल विक्रेता रघुनाथ चुडामण चौधरी हे शिवपूर-कन्हाळा रस्त्यावरील शिव कॉलनीतील समर्थ अपार्टमेंंटमध्ये कुटुंबासह वास्तव्यास आहेत. कुटुंबातील सून वगळता सर्व सदस्य शनिवारी श्री क्षेत्र शिरसाळा मारोती येथे देव दर्शनासाठी गेले होते तर घरातील सूनबाई मुलासह अपार्टमेंटसमोरील नातेवाईकांकडे शनिवारी दुपारी 12.30 ते एक वाजेच्या दरम्यान गेल्या होत्या. याचवेळेत चारचाकीतून सुटा-बुटातील पाठीमागे बॅग लावलेले चोरटे अपार्टमेंटजवळ आले. तिघांनी सरळ अपार्टमेंटमध्ये पाय ठेवला तर एक जण वाहनात बसून मोबाईलवर बोलत राहिला. पाहुणे आले असावेत? म्हणून गल्लीतील लोकांनी दुर्लक्ष केले मात्र चोरट्यांनी धारदार शस्त्राने दरवाजाचा कडी-कोयंडा तोडत गोदरेज कपाटातील दोन लाखांची रोकड, 26 ग्रॅम वजनाचे दोन नेकलेस, लहान मुलांच्या अंगठ्या, कानातले टॉप्स असा सुमारे लाखोंचा ऐवज लंपास केला.
पोलिस अधिकार्यांची घटनास्थळी धाव
सुनबाई दोन वाजेच्या सुमारास प्लॅटमध्ये आल्यानंतर दरवाजा उघडा दिसताच चोरीचा प्रकार उघड झाला. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, नूतन पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व सहकार्यांनी पाहणी केली. ठसे तज्ज्ञांसह डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले.


