भुसावळात कोम्बिंग : सात संशयीत जाळ्यात
भुसावळ : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री कोम्बिंग राबवत सात संशयीतांच्या मुसक्या बांधल्या. अचानक झालेल्या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली. एक हद्दपार संशयीतासह तीन संशयावरून फिरणारे आणि तीन वॉन्टेड अशा एकून सात संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे. शहर व बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाचवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले.
यांच्या नेतृत्वात शहरात कोम्बिंग
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष भोये, पोलिस उपनिरीक्षक महाजन, पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट व पोलीस स्टेशन येथील स्टाफने तसेच शहर, बाजारपेठ पोलिस ठाण्यातील डीबी पथकातील कर्मचारी कोम्बिंगमध्ये सहभागी झाले.
तीन वॉण्टेड संशयीत जाळ्यात
भुसावळ उपविभागातील 32 संशयीत वॉण्टेडपैकी तीन संशयीत मिळून आले. त्यात अनिस खान सिकंदर खान (45), सज्जाद खान अनिस खान (19) तसेच भुसावळ शहर पोलिसांना हवा असलेला संशयीत विष्णू परशुराम पथरोड यास अटक करण्यात आली.
न्यायालयात हजर न राहणार्या 11 संशयीतांना रात्रीच्या कोम्बिंगमध्ये पोलिसांनी बेलेबल वारंटची बजावणी केली. दहा हद्दपार पैकी एक संशयीत शाकीर ऊर्फ गोलु शेख रशीद हा शहरात आढळल्याने त्याच्याविरोधात भादंवि 142 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयीतरीत्या फिरणार्या तिघांना अटक
मध्यरात्री गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयीरीत्या फिरणार्या मजहर उद्दीन एजाज उद्दीन शेख (29), जुबेर शहा कय्युब शहा (19) व शाम तायडे (22, सर्व रा.भुसावळ) यांना अटक करण्यात आली.


