भुसावळातील वेल्डींग स्फोटात ठार झालेल्या दोघा कामगारांवर अंत्यसंस्कार


भुसावळ : फर्निश ऑईलने भरलेल्या टाकीला कामगारांकडून वेल्डींग केले जात असताना स्फोट होवून जागीच दोघे मजूर ठार झाल्याची घटना भुसावळपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलव्हाय शिवारातील दिव्या कॉपर मास्टर अलाईस अ‍ॅण्ड कंपनीत ऑईल कंपनीत शुक्रवार, 21 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेत काशीनाथ फत्तू सुरवाडे (40, रा.खेडी रोड, जळगाव, मुळ रा.हतनूर) आणि खेमसिंग हेमराज पटेल (26, रा.बेमतेरा, छत्तीसगड) यांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनेतील दोन्ही मृतांवर शनिवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत पटेल यांच्या छत्तीसगड राज्यातील नातेवाईकांनी जळगाव येथेच अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला तर काशीनाथ सुरवाडे यांच्यावर मूळ गावी हतनूर येथे दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
या दुर्घटनेप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात शुक्रवारी रात्री अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चोपडा तालुक्यातील आडगाव येथील कमलाकर माळी यांच्या मालकिची ही कंपनी आहे. शनिवारी भुसावळ तालुका पोलिसांनी माळी यांची चौकशी करीत कंपनीच्या परवान्यासह अन्य कागदपत्रांबाबत सखोल चौकशी केली. याबाबत पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नसून सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. दरम्यान, स्फोटात ठार झालेले काशीनाथ सुरवाडे हे वांजोळा ग्रामसेवक आनंदा सुरवाडे यांचे लहान बंधू होत. मयत काशीनाथ सुरवाडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परीवार आहे. अंत्ययात्रेप्रसंगी ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रीतम शिरतुरे, जिल्हा सरचिटणीस संजय भारंबे, जिल्हा मानद सचिव गौतम वाढे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खैरनार यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक अंत्ययात्रेप्रसंगी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !