सर्वोच्च दिलासा : आमदार गिरीश महाजनांसह भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन अखेर रद्द
नवी दिल्ली : भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन (mla girish mahajan) यांच्यासह भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने या आमदारांना (mla) मोठा दिलासा मिळाला असलातरी राज्य सरकारला धक्का बसला आहे.
गैरवर्तनाचा ठपका ठेवत झाले होते निलंबन
राज्य सरकारने विधानसभेत गैरवर्तन केल्याच्या आरोपांवरून भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी ं निलंबन केलं होतं. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोनदा सुनावणी झाली होती. शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. यामध्ये आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी भाजप आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते.


सर्वोच्च दिलासा
या कारवाईला भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आमच्यावर सूड भावनेने कारवाई केल्याचं म्हटलं होतं. आमच्यावर अन्याय झाल्याचंही भाजप आमदारांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं होतं. त्यानंतर राज्य सरकारच्या वकिलांनी आपली बाजू मांडताना आमदारांचं निलंबन करण्याचा अधिकार हा विधानसभेचा आहे. तो त्यांच्या कार्यकक्षेचा भाग असल्याचं म्हटलं होतं. दोन वेळा या प्रकरणावर कोर्टात सुनावणी झाली होती. त्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यावर शुक्रवारी अखेर निर्णय आला आहे.
