अँटिलिया प्रकरण व मनसुख हिरेन प्रकरणाचे परमबीर सिंगच मास्टरमाईंड : अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ
मुंबई : अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन हत्या कटाचे परमबीर सिंग (Param Bir Singh) हेच मास्टरमाईंड असल्याचा मोठा दावा अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ईडीसमोर केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची ईडीकडून चौकशी केली जात असून यातून अनेक धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. देशमुख यांच्या नव्याने दाव्याने आता पुन्हा नवीन वाद समोर येण्याची शक्यता आहे.
होय, सिंग हेच मास्टरमाईंड
अँटिलियासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी आपल्याला माहिती देताना परमबीर सिंग (Param Bir Singh) दिशाभूल करत होते. कारण या प्रकरणात त्यांचे सहकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांचे नाव समोर आले होते आणि सिंग हेच त्याचे मास्टरमाईंड आहेत, असे आपल्याला कळाले होते म्हणून त्यांना आयुक्तपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपल्यावर खोटे आरोप केले आणि नैतीकता म्हणून आपण गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, असे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सांगितले.


मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तपास एटीएसकडे सोपवला
परमबीर सिंग (Param Bir Singh) यांना पोलिस आयुक्तपदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. अँटिलिया घोटाळा आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्यांच्यासह त्यांचे जवळचे मित्र सचिन वाझे आणि अन्य चार जणांची नावे समोर आल्याने सिंग यांना आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. सचिन वाझे आणि त्यांचे सहकारी मनसुख हिरेन यांनी स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या काठ्या लावल्याचा आरोप होता, या प्रकरणी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली होती. ब्रीफिंगसाठी बोलावले होते, तेव्हा मी गृहमंत्री होतो आणि सिंग (Param Bir Singh) यांना बोलावले तेव्हा मी, अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, लिमये आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होतो. त्या ब्रीफिंगवेळी अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हत्येच्या संदर्भात सिंग देत असलेली ब्रीफिंग दिशाभूल करणारी होती. यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला, असेही देशमुख (Anil Deshmukh) यांनी म्हटले आहे.
बदल्यांची यादी अनिल परबांनीच दिली
मला कुठल्याही व्यक्तीने यादी दिलेली नव्हती, तर अनिल परब (Anil Parab) यांनी यादी दिली होती. तिच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती. बदल्यांसंदर्भातील यादी गृह मुख्य सचिवांकडे द्यावी लागते. त्यानुसार ती दिली होती. या यादीनुसारच बदली करावी. पण जे नियमात बसत असेल तेच करा नाहीतर नावे बाहेर काढा असेही तत्कालीन सचिवांना सांगितले होते, असे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यापूर्वी म्हटले होते.
