जळगावातील चौघा नगरसेवकांचा भाजपाला ‘जय श्रीराम’ : राजकीय वर्तुळात खळबळ
जळगाव : जळगाव महापालिकेच्या राजकारणात पुन्हा धक्कातंत्राचा वापर झाल्याने भाजपातील चार नगरसेवकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे तर सभागृह नेते ललित कोल्हे यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाली.
राजकीय वर्तुळात खळबळ
जळगाव महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून पक्ष प्रवेशावरून अनेक ठिकाणी राजकारण सुरू आहे. महापौर निवडीप्रसंगी भाजपचे 28 नगरसेवक गळाला लावत शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी तर भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले होते. शिवसेना सत्तेत आल्यानंतर भाजपने खेळी करीत 10 बंडखोरांना आपल्याकडे आणण्याचा यशस्वी डाव खेळाला होता. 10 नगरसेवक पुन्हा भाजपात गेल्यानंतर शिवसेना पुन्हा बहुमताच्या काठावर पोहचली होती.


पुन्हा नगरसेवक शिवसेनेत
पुन्हा भाजपात गेलेल्या नगरसेवकांना पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी सभागृह नेते ललित कोल्हे हे प्रयत्नशील होते. बंडखोर नगरसेवकांच्या ते कायम संपर्कात होते. अखेर सभागृह नेते ललित कोल्हे यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाली असून चार नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. शुक्रवारी पालकमंत्रगुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात नगरसेवक प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, मीनाक्षी पाटील, मीना सपकाळे यांनी पाळधी येथे शिवबंधन बांधले आहे. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे, सरीता माळी, धुडकू सपकाळे, मंगेश जोहरे, गोकुळ पाटील, अॅड.दिलीप पोकळे, कुंदन काळे, आशुतोष पाटील, हर्षल मावळे आदी उपस्थित होते.
