संत मुक्ताई यात्रोत्सवाची तयारी पूर्ण : उद्या ध्वज पूजनाने होणार आरंभ
मुक्ताईनगर : श्री संत चांगदेव मुक्ताबाई महाशिवरात्री यात्रोत्सव दोन वर्षाच्या खंडानंतर शुक्रवार, 25 रोजी ध्वजपूजन करून यात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. संत मुक्ताबाई संस्थान व कोथळी ग्रामपंचायत, मुक्ताईनगर नगरपंचायतीची तयारी पूर्णत्वाकडे आहे. पाळणे, खेळणी आदी दुकाने येण्यास सुरूवात झाली असून शुक्रवारी दिंड्यांचे आगमन पंचक्रोशी परीसरात दाखल होणार आहेत.
शुक्रवारी होणार ध्वजपूजन
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या गुरू-शिष्य जोडीचे अतुट बंधन असलेली संत चांगदेव मुक्ताबाई माघवारी महाशिवरात्री यात्रा दोन वर्षांच्या खंडानंतर होत आहे. श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ मूळ मंदिरात संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष अॅड.भैय्यासाहेब रवींद्र पाटील व विश्वस्त मंडळाच्या हस्ते व भाविक मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी 10 वाजता ध्जजपूजन करून करण्यात येणार आहे. संत मुक्ताबाई संस्थानने भाविकांची दर्शनासाठी गर्दी होवू नये यासाठी दर्शन बारी नवीन बांधकाम केलेल्या जागेत नियोजन करण्यात आले आहे. परीसरातील साफसफाई कामे अंतिम टप्प्यात आहे. मध्यप्रदेश व राज्यभरातून निघालेल्या दिंड्या तालुक्यात घोडसगाव तरोडा सातोड, रुईखेडा, खामखेडा, निमखेडी, वरणगाव, टहाकळी, हरताळे, गावी मुक्काम करून शनिवारी मुक्ताईनगरात दाखल होतील. रविवार, 27 रोजी एकादशी व मंगळवार, 1 मार्च महाशिवरात्री हे मुख्य दिवस असल्याची माहिती संत मुक्ताबाई मुळमंदिराचे व्यवस्थापक उध्दव महाराज जुनारे यांनी दिली. दरम्यान, यात्रोत्सवानिमित्त खेळण्यांचे दुकाने, उंच पाळण्यांसह भांड्यांची दुकाने थाटण्यास सुरूवात झाल्याचे सरपंच नारायण दादा चौधरी यांनी सांगितले.


