फैजपूरातील प्रांत कार्यालयासाठी उपलब्ध जागांची माहिती जिल्हाधिकार्‍यांना कळवणार


सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांसह नागरीकांच्या बैठकीत एकमुखाने निर्णय

फैजपूर : फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयासाठी शहरात शासकीय जागा मिळत नसल्याने शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरीकांची बैठक घेत शहरात उपलब्ध असलेल्या जागासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासह वरीष्ठ पातळीवर निवेदन देण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.

सावद्यात प्रांत कार्यालय हलवण्यासाठी हालचाली
यावल रावेर तालुक्यासाठी असलेले प्रांताधिकारी कार्यालय हे गेल्या सात वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने फैजपूर येथे मंजूर केले होते. या कार्यालयाला फैजपूर पालिकेने स्वतत्ची जागाही उपलब्ध करून दिल्याने नागरीकांची मोठी सोय झाली होती शिवाय हे फैजपूर शहराच्या बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कार्यालयामुळे फैजपूर शहरात शिक्षण घेत असलेल्या रावेर-यावल तालुक्यातील जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांची विविध दाखल्यासांठी सोयही झाली होती. शासन दरबारी आपल्या समस्या मांडण्यासाठी उपविभागीय कार्यालय शहरात असल्यामुळे नागरीकांची सोय झाली असताना प्रांत कार्यालयाला स्व-मालकीची जागा हवी असल्याने ती शहरात जागा उपलब्ध नसल्याने हे कार्यालय आता सावदा येथे हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत मात्र फैजपूरातून कार्यालयाचे स्थलांतर होवू न देण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमले व त्यांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बैठक घेतली. प्रांत कार्यालय हलवण्याच्या निर्णयाबाबत कडाडून विरोध करण्यात आला शिवाय हे कार्यालय फैजपूर येथेच असावे यासाठी शहरातील तलाठी कार्यालय, बस्थानकसमागील दक्षिणेकडिल जागा, वनविभाग जागा, नगरपालिका मालकीची गट नं 1427 या उपलब्ध जागांबाबत शासन दरबारी तसेच खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी व जिल्हाधिकारी यांना गुरुवारी निवेदन देण्याचे ठरले. वेळ पडल्यास आंदोलन छेडण्याचा निर्धारही बैठकीत करण्यात आला.




यांची बैठकीला उपस्थिती
बैठकप्रसंगी जिल्हा दूध संचालक हेमराज चौधरी, माजी नगराध्यक्ष पी.के.चौधरी, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, नगरसेवक देवेंद्र साळी, सातपुडा अर्बन व्हा.चेअरमन चंद्रशेखर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र होले, मनु टेलर, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रीयाज, भाजपा शहराध्यक्ष संजू रल, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अन्वर खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शेख शाकीर, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष अशोक भालेराव, हाडवैध रघुनाथ कुंभार, युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र कार्याध्यक्ष मुदस्सर नजर, राजाभाऊ चौधरी यांच्याासह सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !