मानकी नदीपुलाखाली नन्नवरेच्या इसमाचा मृतदेह आढळला
यावल : तालुक्यातील दगडी मनवेल ते डांंभुर्णी रस्त्यावरील मानकी नदीच्या पुलाखाली एका 30 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना बुधवारी दुपारी उघडीस आली. रामचंद्र देविदास नन्नवरे (30, रा.रवंजा ता.जळगाव) असे मृताचे नाव आहे. पुलावरून तोल जावून नन्नवरे यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. डिगंबर रूपचंद सोनवणे (रा.दगडी) यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पुलावरून पडल्याने मृत्यूचा संशय
सोनवणे यांच्या खबरीनुसार बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते घरी येत असतांना त्यांना नागरीकांनी माहिती दिली की, दगडी शिवारात असलेल्या मानकी नदीच्या पुलाखाली एका इसमाचा मृतदेह पडला आहे तेव्हा त्यांनी तिथे जावुन पाहिले असता मयत हा त्यांचा शालक असल्याचे दिसुन आले. मयत रामचंद्र देविदास नन्नवरे (रा.रवंजा, ता.जळगाव) याची सासरवाडी डांभुर्णी, ता.यावल येथील असुन तो तेथुन दगडी येथे येत असावा मात्र, त्याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने व मनावर परीणाम झाल्याने दगडीकडे येत असतांना मानकी नदीच्या पुलावरून त्याचा तोल जावुन तो खाली पडला असावा त्याच्या तोंडाला व डोक्याला जबर दुखापत होवुन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. तपास हवालदार युनूस तडवी, संजय देवरे करीत आहेत.



