‘किस बाई किस, दोडका किस’ म्हणत मंगळागौरीचा खेळ रंगला
स्वयंसिध्दा सखी मंडळाने सादर केले प्रात्यक्षिक
भुसावळ : चला ग मंगळा गौरीचा या करुया जागर, किस बाई किस दोडका किस, घागर घूमु दे, नाच ग घुमा अशा गाण्यांवर मंगळागौरीचा पारंपरीक खेळ खडका (ता. भुसावळ) येथे रंगला. भुसावळच्या स्वयंसिद्धा सखी मंडळातर्फे या निमित्ताने गाणी, उखाणे व विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. श्रावण महिन्यात नववधूचा येणारा पहिलाच सण म्हणजे मंगळागौर होय. या दिवशी नवदांपत्य महादेवाची पूजा करतात त्यानंतर रात्री नववधूच्या मैत्रिणी गाणे म्हणत खेळतात मात्र परंपरा लोप पावत चालली असलीतरी शहरातील काही महिलांनी खेळाची परंपरा टिकवून आहेत.
पारंपरीक वेषभूषेत केला खेळ सादर
खडका (ता.भुसावळ) येथील सुभाष जोशी यांच्या मुलीच्या मंगळागौर सणा निमित्ताने स्वयंसिध्दा सखी मंडळातर्फे पारंपरीक वेषभूषेत खेळ सादर करण्यात आले. यात झिम्मा, फुगडी, पिंगा, गाठोड, गोफ, आगोटा पागोटा, लाट्या बाई लाट्या, ताक घुसळणे आदी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आले तसेच चला ग मंगळागौरीचा करुया जागर, रुणुझूणूच्या पाखरा, किकीच पान बाई किकीच, नाच ग घुमा, अग अग सुनबाई आदी पारंपरिक गाणी सादर करतांना बहिणाबाईंचे अरे संसार संसार या कवितेवर आधारीत नाटिका सादर करण्यात आली. विविध उखाणे घेत या खेळात नववधुलाही सहभागी करुन घेण्यात आले. शोभा इंगळे, सुरेखा मोरे, सरीता चौक यांनी गाणी म्हंटली. त्यांना यश कुलकर्णी याने तबल्यावर साथ दिली. सीमा डोलारे यांनी विविध प्रसंगांची पार्श्वभूमी सांगणारे निवेदन ओघवत्या शैलीत सादर केले. सुनीता कुलकर्णी, सरोज कवीश्वर, धनश्री जोशी, मनीषा इखे, साधना तारांबळे, प्रगती कुलकर्णी, रूपाली महाजन, ज्योती कुलकर्णी, मंगला कुलकर्णी यांनी खेळाच्या माध्यमातून विविध प्रात्यक्षिके सादर केली.
नव्या पिढीला सांस्कृतिक ठेवा माहिती असणे गरजेचा
मंगळागौरीच्या खेळामुळे महिलांच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे वेगळी योगासने करण्याची गरज पडत नाही. या खेळामुळे आमच्या मनाला आनंद तर मिळतोच शिवाय समाधानही वाटते. तसेच प्रेक्षकांचे यानिमित्ताने सात्विक मनोरंजनही होते. नव्या पिढीला हा पारंपरिक सांस्कृतिक ठेवा माहीत असणे आवश्यक आहे, असे मत स्वयंसिध्दा सखी मंडळाच्या ग्रुप प्रमुख सुनीता कुलकर्णी यांनी व्यक्त केले.