रावेरात एप्रिल महिन्यात होणार रंगपंचमी व्याख्यानमाला


रावेर : कोरोनाच्या निर्बंधांमुळे डिसेंबर महिन्यात होऊ न शकलेली रंगपंचमी व्याख्यानमाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याची माहिती व्याख्यानमालेचे विश्वस्त दिलीप वैद्य आणि डॉ.राजेंद्र आठवले यांनी दिली. गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे व्याख्यानमाला पूर्ण होऊ शकली नव्हती. व्याख्यान मालेत खंड पडू नये म्हणून 2020 मध्ये तालुक्यातील तीन माध्यमिक शाळांमध्ये व्याख्यानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले मात्र नंतरची दोन व्याख्याने कोरोनाच्या निर्बंधांमुळे होऊ शकली नव्हती आणि डिसेंबर 2021 मध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करणे शाळेमधून देखील शक्य झाले नव्हते.

लवकरच होणार पदाधिकार्‍यांची निवड
या पार्श्वभूमीवर आणि श्रोत्यांच्या मागणीप्रमाणे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यावर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी विविध वक्त्यांशी संपर्क साधण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच त्यांची नावे जाहीर करण्यात येतील आणि व्याख्यानमालेसाठी अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी यांची निवड जाहीर करण्यात येईल, असे व्याख्यान मालेच्या वतीने कळविण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !