गृहरक्षक दल कर्मचारी तीन महिन्यांपासून मानधनापासून वंचित
वरणगाव- पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्ताची सेवा देणार्या गृहरक्षक दलाच्या जवानांना गेल्या तीन महिन्यांपासून मानधनापासून वंचित ठेवण्यात आल्याने त्यांच्या नाराजीची भावना व्यक्त होत आहे. सप्टेंबर महिन्यात बकरी ईदच्या सणापासून गणेशोत्सव, नवरात्र, गोकुळाष्टी, पोळा त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकात गृहरक्षक दलाने पोलिसांसोबत आपली सेवा बजावली परंतु महाराष्ट्र शासनाने या जवानांना मानधनापासून वंचित ठेवल्याने त्यांचा दसरा व दिवाळी सण अंधारात गेला. प्रत्येक कर्मचार्याचे साधारणतः 25 ते 30 हजारांपर्यंत शासनाकडे मानधन थकबाकी असून वरीष्ठ अधिकारी सुध्दा याबाबत कोणतीच दखल घेत नसल्याचे चित्र आहे. शासनाने गृहरक्षक दलाचा श्रमाचा पैसा लवकरात तातडीने अदा करावा, अशी मागणी होत आहे.
