दर्यापूर ग्रामपंचायतीला अखेर जि.प.सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी ठोकले कुलूप


ग्रामपंचायत सोयी-सुविधा पुरवण्यास अपयशी : वरीष्ठ अधिकार्‍यांनी फिरवली पाठ

भुसावळ : तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायत तब्बल चार वर्षांपासून ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारच्या सोयीसुवीधा पुरवत नसल्याने मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शेकडो तरुणांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत जिल्हा परीषद सदस्या सरला सुनील कोळी यांनी ग्रामपंचायतीवर धडक देत कुलूप ठोकले. दरम्यान, या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासन आता काय भूमिका घेते ? याकडे आता लक्ष लागले आहे.

सोयी-सुविधांपासून ग्रामस्थ वंचित
साध्या मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यास ग्रामपंचायत सपशेल अपयशी ठरली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसेवक अथवा सरपंच यांनी आजपर्यंत कुठलीही धडक कृती वा पाऊल उचलले नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. 29 एप्रिल रोजी ग्रामस्थांनी भुसावळ पंचायत समिती प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र वरीष्ठांनीदेखील या बाबीकडे दुर्लक्षच केले. सोमवारीदेखील तरुणांनी सरपंच वंदना चौधरी व ग्रामसेवक आर.ए.चौधरी यांना भ्रमणध्वनीवरून ग्रामपंचायत कार्यालयात बोलावले. यावेळी सरपंच व सदस्यांसमोर ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचला मात्र सरपंच यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला.

अखेर ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले
ग्रामस्थांच्या समस्या सुटत नसल्याने मंगळवारी सकाळी 11 वाजता जिल्हा परीषद सदस्या सरला कोळी, सदस्य सुनील कोळी, जीवराम सुरवाडे, राजेश शिंदे, बोधीसत्व आहिरे आदी सदस्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलून ठोकले. जोपर्यंत ग्रामस्थांच्या समस्या सुटत नाही तसेच वरीष्ठ अधिकारी गावाला भेट देत नाही तोपर्यंत कुलूप न उघडण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

ग्रामस्थांच्या हितासाठी लढा -जि.प.सदस्य
विविध समस्यांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याने तरुणांच्या मानसिकतेचा उद्रेक झाल्याने मी स्वतः पुढाकार घेवून ग्रामपंचातीला कुलूप ठोकले. आपला लढा ग्रामस्थांच्या हितासाठी असून ग्रामस्थांना न्याय मिळेपर्यंत आपण शांत बसणार नाही, असे जिल्हा परीषद सदस्या सरला सुनील कोळी यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
ग्रामपंचायतीला कुलूप ठोकताना जिल्हा परीषद सदस्या सरला कोळी व गावातील अजय कोळी, संदीप निबांळ्कर, अरविंद निकम, खुषाल पाटील, धनराज पाटील, अजय पाटील, जयराज मराठे , प्रकाश इंगळे, निखील पाटील, सागर पाटील, भानुदास चौधरी, मंगेश चौधरी, सागर तायडे, झुलेलाल कोळी, कमलाकर पाटील, तुषार कोळी, पवन चौधरी, दीपक पाटील, दिलीप नि बांळकर, योगेश पाटील, रीतेश पाटील, धीरज कोळी यांच्यासह गावातील तरुण उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !