यावलमधील ग्रामीण रुग्णालयाची वाताहत
स्वच्छतागृहाची दुरवस्था तर पाण्याच्या टाक्याही नादुरुस्त
यावल : शहरातील ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था झाली आहे. या रुग्णालयातील स्वच्छतागृह तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या नादुरुस्त झाल्या असून इमारतीचा स्लॅबदेखील काही दिवसांपूर्वी कोसळला आहे. रुग्णालयाच्या आतील खडकी दरवाजे नादुरूस्त असून अनेक ठिकाणी अस्वच्छता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येथील दुरुस्तीकरीता पत्र देण्यात आले असून तत्काळ या ठिकाणी आवश्यक ती दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
रुग्णालयातील पाण्याच्या टाक्याही फुटल्या
यावल ग्रामीण रुग्णालय इमारतीची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. प्रामुख्याने येथे असलेल्या तीन पाण्याच्या टाक्या या फुटल्या असून रुग्णालयातील कर्मचार्यांसह रुग्णांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे तसेच या इमारतीत अनेक ठिकाणी प्लास्टर कोसळले आहे. जुन्या असलेल्या इमारतीच्या आत असलेले सार्वजनिक व कर्मचार्यांच्या स्वच्छतागृहाचीदेखील दुरवस्था झाली आहे या स्वच्छतागृहातील खिडक्या दरवाजे नादुरूस्त असून अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरत आहे. अशा अनेक अडचणीने या इमारतीला ग्रासले असून हीच परीस्थिती राहिली तर इमारत धोकेदायक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
पत्र देणार -अधीक्षक किरण जावळे
रुग्णालयाच्या देखभाल दुरुस्ती संदर्भात लवकरच पुन्हा पत्र देणार अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक किरण जावळे यांनी दिली आहे. यापूर्वी देखील दुरुस्ती साठी पत्र देण्यात आलं होतं मात्र पावसाळा असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती झाली नाही. पुन्हा आता त्यांना पत्र देऊन मुख्यत पाण्याच्या टाक्या दुरुस्ती करण्याची मागणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

