रावेरसह फैजपूरात अखेर हद्दवाढीला मंजुरी


नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी काढली अधिसूचना : हद्दीबाहेरील नागरीकांमध्ये आनंदाची लहर

रावेर : रावेरसह फैजपूर नगरपालिकेच्या हद्दवाढीची अंतीम अधिसूचना नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी काढल्याने ग्रामीण भागाच्या नागरीकांना नगरपालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून नगरपालिकेच्या अंतिम हद्द वाढीच्या निर्णयाचे रावेर ग्रामीण भागातील जनतेने स्वागत केले आहे. दरम्यान, पालिका हद्दीबाहेर राहणार्‍या नागरीकांना आता मूलभूत सोयी-सुविधा पालिकेकडून मिळणार आहे तर दुसरीकडे भुसावळातील हद्दवाढीला मात्र अद्यापही मंजुरी न मिळाल्याने पालिका हद्दीबाहेर राहणार्‍या नागरीकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

4 रोजी निघाली अंतिम अधिसूचना
यापूर्वी रावेर नगरपालिकेची हद्दवाढ झाल्याची घोषणा 2 मार्च 2019 रोजी झाली होती त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या दालनात हद्दवाढीवर काही हरकती मागवण्यात आल्या त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे अंतिम अधिसूचनेला उशीर झाला परंतु 4 रोजी अंतीम हद्दवाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली. यामुळे शहरालगतचे श्रीकृष्ण नगर, प्रोफेसर कॉलनी, उटखेड़ा रोड, तडवी नगर, पीपल्स बँक कॉलनी, सौभाग्य नगर, पंचमुखी हनुमान नगर, रामचंद्र नगर, मानकर नगर, विद्या नगर, महात्मा फुले, शिवाजी चौकातील ग्रामीण भाग, स्वतिक नगरासह रावेर ग्रामीण भागाच्या सर्व कॉलण्या तसेच नगर यापुढे रावेर नगरपालिका हद्दीत समाविष्ट होतील.

हद्दीबाहेरील भागाचे सर्वेक्षण -मुख्याधिकारी लांडे
रावेर नगरपालिकेला बुधवारी नगरविकास विभागाची अंतीम अधिसूचना प्राप्त झाली असून रावेर ग्रामीण भागाची अधिकृत हद्द वाढ आता झाली आहे. पुढील आठवड्यापासून रावेर ग्रामीण भागात रस्ते, गटारी, विजेबाबत सर्वेक्षण सुरू करण्यात येईल. पाण्याच्या नियोजनासाठी जागेची सुध्दा पाहणी करणार असून यावर अंतीम डीपीआर तयार करणार असल्याचे रावेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी सांगितले.

हद्दवाढीच्या पाठपुराव्याला यश -नगराध्यक्ष
रावेर नगरपालिकेची हद्द वाढ व्हावी यासाठी आम्ही पालिकेच्या माध्यमातून अनेकवेळा पाठपुरावा केला. अनेकवेळा आम्ही नगरविकास मंत्रालयात जावून त्रृटी पूर्ण केल्या. हद्दवाढ झाल्याचा अंतिम आदेश आज आल्यानंतर रावेरातील ग्रामीण भागाकडे आम्ही लक्ष देणार आहोत. रस्ते, गटारी, वीज, पाणी पुरविण्यासाठी लवकरच सर्वेक्षण करण्याच्या सूचना पालिकेला देणार आहे. हद्द वाढीसाठी सहकार्य करणार्‍या सर्वांचे आभार .पुढेही पालिकेला सहकार्य करण्याचे अवाहन रावेर नगरपालिकेचे नगराध्यक्ष दारा मोहोम्मद यांनी केले आहे.

फैजपूर हद्दीबाहेरील नागरिकांना मोठा दिलासा
फैजपूर- फैजपूर शहराच्या हद्दवाढीची अंतिम अधिसूचना 4 नोव्हेंबर रोजी जाहीर झाल्याचे अंतिम अधिसूचनेचे शासनाचे राजपत्र फैजपूर पालिकेला बुधवारी प्राप्त झाले. शहरातील हद्दीबाहेरील रहिवासी वस्त्या शहर हद्दीत समाविष्ट व्हाव्या यासाठी फैजपूर पालिकेकडून तत्कालीन नगराध्यक्षा अमिता हेमराज चौधरी यांच्या सन 2012-13 च्या कार्यकाळात हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करून पदाधिकारी व पालिका प्रशासनाकडून शासन दरबारी पाठपुरावा करून वारंवार निघत असलेल्या त्रृटी पूर्ण करण्यासाठी प्रगती पथावर प्रयत्न करण्यात आले. शहर सुधारीत हद्दवाढीच्या विषयाला 4 फेब्रुवारी 2019 रोजी विद्यमान नगराध्यक्षा महानंदा रवींद्र होले अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या फैजपूर पालिकेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. या विषयाला शासनाच्या नगरविकास मंत्रालया कडून तात्काळ मंजुरी मिळावी यासाठी फैजपूर पालिका प्रशासनाच्या बांधकाम विभागाकडून फैजपूर शहर हद्दवाढीच्या प्रस्तावासाठी लागणारे नकाशा व अत्यावश्यक प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ जिल्हाधिकारी यांच्या कडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडे हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येऊन फैजपूर शहराच्या हद्दवाढीच्या अधिसूचनेची उद्घोषणा जाहीर झाल्याचे अधिसूचनेचे राजपत्र फैजपूर पालिकेला 2 मार्च 2019 रोजी प्राप्त झाले होते. ही घोषणा राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसांचे आत 1 एप्रिलपर्यंत हरकतीसाठी मुदत देण्यात आली होती. या राजपत्रात शहराच्या हद्दीत समाविष्ट करायच्या स्थानिक क्षेत्राचा तपशील देण्यात आला होता त्यानुसार फैजपूर शहराच्या हद्दवाढीची अंतिम अधिसूचनेचे शासनाचे राजपत्र फैजपूर पालिकेला बुधवार, 6 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाले.

पालिकेच्या उत्पन्नात होणार वाढ
फैजपूर शहराची पूर्वीची हद्दवाढ तीन स्वेअर किलोमीटर आहे तर 2.83 स्न्वेअर किलोमीटर क्षेत्रात हद्दवाढ झाली असून नवीन शहर हद्दीचे क्षेत्र 5.84 स्क्वेअर किलोमीटर इतके झाले आहे. शहराच्या हद्दवाढ भागांचा विकास होणार आहे शिवाय पालिकेकडून अत्यावश्यक सोई सुविधा उपलब्ध होणार असल्याने शहर विकासात भर पडणार आहे व पालिकेच्या विविध करापोटी पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे

सुविधा पुरवणार -मुख्याधिकारी
शहरातील पूर्व, पश्चिम व उत्तर भागातील रहिवाशांना या हद्द वाढीचा फायदा होणार आहे पालिके कडून नवीन सुविधां पुरवण्यासाठी शासन दरबारी पालिका प्राशसन प्रयत्न करणार आहे. लवकरच नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविल्या जातील, असे मुख्याधिकारी किशोर चव्हाण म्हणाले.

सर्वांचे आभार -नगराध्यक्ष
तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक विद्यमान सर्व नगरसेवक पालिका प्रशासन यांच्या पाठपुराव्यांमुळे आज शहराची हद्दवाढ करण्यात आली असल्याचे परिपत्र प्रशासनाकडून प्राप्त झाले. या प्रस्तावातील त्रृटी दूर करून पुन्हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. यासाठी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे व आमदार हरीभाऊ जावळे यांनी सतत शासन दरबारी पाठपुरावा केला तसेच पालिकेचे सर्व नगरसेवक व पालिका प्रशासन यांचे आभार व्यक्त करते, असे नगराध्यक्षा महानंदा होले म्हणाल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !