शेती पंचनाम्यासाठी पाच हजारांची लाच घेणारा नगरदेवळा तलाठी व कोतवाल जाळ्यात


नगरदेवळा गावातील प्रकार : जळगाव एसीबीच्या धडक कारवाईचे स्वागत

जळगाव : अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असताना शेतकरी माय-बाप सरकारकडून पंचनाम्यांसह भरपाईची वाट पाहत असताना पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा तलाठ्यासह कोतवालाने चक्क शेतकर्‍याच्या शेतातील पिकंच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्याचा संतापजनक प्रकार गुरुवारी उघडकीस आली. तक्रारदार शेतकर्‍याने एसीबीकडे तक्रार नोंदवताच लाचखोर तलाठी मिलिंद जयवंत बच्छाव (रा.कजगाव, ता.भडगाव) व कोतवाल विलास उर्फ कैलास काशीनाथ धीवरे (45, रा.नगरदेवळा) यांना लाच घेताना तलाठी कार्यालयाच अटक करण्यात आली.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना
ऐन दिवाळी सणात शेतकर्‍यांच्या तोंडाशी घास आला असताना अवकाळी पावसाने सर्व चित्र पालटल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला. शेतकर्‍यांच्या रेट्यानंतर सर्वत्र पंचनाम्यांचे सोपस्कार सुरू असताना नगरदेवळा तलाठ्याने मात्र तक्रारदार शेतकर्‍याच्या शेतातील मक्यासह कपाशीच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी गुरुवारी चक्क पाच हजारांची लाच मागितली. तक्रारदार शेतकरी आधीच मेटाकुटीला आला असताना त्यास लाच द्यावयाची नसल्याने त्याने गुरुवारी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली. 7 रोजी दुपारी पंचांसमक्ष नगरदेवळा तलाठी कार्यालयाबाहेर आरोपी कोतवालाने लाच स्वीकारून ती तलाठ्याकडे सोपवताच सापळा रचून असलेल्या पथकाने दोघांच्याही मुसक्या आवळल्या.




यांच्या पथकाने आवळल्या मुसक्या
ही कारवाई नाशिक एसीबीचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे व जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय रवींद्र माळी, नाईक मनोज जोशी, जनार्दन चौधरी, कॉन्स्टेबल प्रशांत ठाकुर, नासीर देशमुख, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी आदींच्या पथकाने केली.

अनेक ठिकाणी लाच मागितली जात असल्याच्या तक्रारी
जिल्ह्यात सर्वच पिकांचे नुकसान झाल्यानंतर काही ठिकाणी पंचनामे करण्यासाठी लाच मागितली जात असल्याची ओरड शेतकर्‍यांकडून होत आहे. या संदर्भात प्रशासनाने तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. दरम्यान, शासकीय काम करण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी वा त्यचा हस्तक लाच मागत असल्यास तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, जळगाव अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे वा दूरध्वनी क्रमांक 0257-2235477 तसेच मोबाईल 9607556556 तसेच टोल फ्रि क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !