पतीशी वाद झाल्याने महेलीखेडीतील विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न
यावल : पतीसोबत झालेल्या किरकोळ वादातून तालुक्यातील महेलीखेडी येथे एका 40 वर्षीय महिलेने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. रईसा रमजान देशमुख असे महिलेचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी रईसा देशमुख यांचा पतीशी वाद झाल्यानंतर त्यांनी घरात असलेले उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबाला ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये विवाहितेला दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.डी. बारेला यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. महिलेची प्रकृती खालावत असल्याने तिला तत्काळ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

