शांतता व एकात्मता अबाधीत राहण्यासाठी प्रार्थना
ठिकठिकाणी मुस्लीम बांधवांनी काढली मिरवणूक : हिंदू बांधवांनी गळाभेट देत दिल्या शुभेच्छा : पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
भुसावळ : भुसावळ शहर विभागात ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरातून मुस्लीम बांधवांनी जुलूस (मिरवणूक) काढली होती तर देशात शांतता, एकात्मता अबाधीत राहण्यासाठी प्रार्थनाही करण्यात आली. पोलिस प्रशासनातर्फे मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प देवून शुभेच्छा देण्यात आल्या. ईद उत्साहात व शांतताप्रिय वातावरणात साजरी होण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे सर्वत्र कडेकोट बंदोबस्त राखण्यात आला.
भुसावळात मुस्लीम बांधवांची मिरवणूक
भुसावळ- भुसावळातील मिरवणुकीत राष्ट्रीय ध्वज हाती घेवून एकात्मतेचे दर्शन घडवण्यात आले. रविवारी सकाळी 10 वाजता अमरदीप चौकातून मिरवणूकीस सुरूवात झाली. मिरवणूक मटन मार्केट, शिवाजी नगर, वरणगाव रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मॉडर्न रोड, गांधी चौकी, जुम्मा मशीद, भजे गल्ली, जाम मोहल्ला, जामा मशीद, सुभाष चौकीजवळून जात पालिकेच्या शाळा नंबर तीनजवळ समारोप झाला. मिरवणूकीत पाच हजारापेक्षा जास्त मुस्लीम बांधवांचा सहभाग होता. ईद ए मिलाद कमिटीचे अध्यक्ष सलीम चुडीवाले यांनी मिरवणूकीचे नेतृत्व केले, असे पोलिसांनी सांगितले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे आदींनी मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प देत शुभेच्छा दिल्यात. शहरातील मुख्य मार्गाने मिरवणूक गेल्याने शहरातील रस्त्यांवरील वाहतूक थांबली होती. मुस्लीम बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी मिरवणूकीत मुस्लीम बांधवांनी भारतीय तिरंगा ध्वज घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले. दुपारी शहरातील विविध प्रार्थनास्थळांमध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आले. मिरवणुकीनंतर सफाई अभियानही राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
यावलमध्ये निघाली मिरवणूक
यावल- रविवारी ईद-ए-मिलादून्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील बाबुजीपुरा भागातून मुख्य जुलूस (मिरवणूक) नातेपाक पठण करीत काढण्यात आली. ठिकठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले. जुलूसमधील सहभागी मुस्लिम बांधवांना हिंदु बांधवांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. मिरवणुकीत जिल्हा परीषद काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले डॉ निलेश गडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव सहभागी झाले.
हिंदू बांधवांनी दिल्या शुभेच्छा
जिल्हा परीषदेचे गटनेता प्रभाकर सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, दिलीप वाणी, हाजी शब्बीर खान, नगरसेवक शेख असलम, कदीर खान, शेख अल्ताफ, असलम मोमीन, अनिल जंजाळेसह शहरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, मान्यवरांनी सहभागी होत मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. ईस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद (सल्लल्लाहो अलैही वसल्लम) पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. या निमित्ताने शहरासह विस्तारीत भागात मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये रोशनाई व पताका लावून सजवण्यात आल्या होत्या. रविवारी सकाळी शहरातील बाबुजीपुरा मार्गे, सुदर्शन चौक, डांगपूरा, मन्यारवाडा, मेनरोडने नातेपाकसह शांततेत जुलूस काढण्यात आला. दुपारी एक वाजेनंतर खिर्णीपुरा येथे या जुलूसचा समारोप करण्यात आला. मिरवणुकीत आबालवृध्दांसह बालक, तरूण मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी झाली. ईद ए मिलाद मिरवणुकीमध्ये यावल पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी लहान बालकांना चॉकलेट देऊन बालकांचे कौतुक केले व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
रावेरमध्येही मिरवणुकीचा उत्साह
रावेर- पैगंबर हजरत मोहंमद यांच्या जन्मदिवसानिमित्ताने सालाबादाप्रमाणेमिरवणूक काढण्यात आली. शहरातील गौसीया मस्जिद फत्तेहनगर, हुसैनी मस्जिद फुकटपुरा, इमाम वाडा मस्जिद, नागझिरी मस्जिद, कसाई वाडा मस्जिदमध्ये नमाज पठण करण्यात आले. मण्यारवाडा मस्जिदपासून मिरवणुकीला सुरुवात झाली. शिवाजी चौक, मोमिन वाडा, भोईवाडा, गांधी चौक, मेन रोड नाला, चावडी रोड, कोतवाल वाडा व डॉ.आठवलेच्या घरापासुन पाराचा गणपती, धोबी लोकांच्या घरापासुन मण्यारवाडा मस्जिद जवळ येवून या ठिकाणी या मिरवणुकीचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी मौलाना गयासुद्दीन होते. यावेळी मौलाना नजर अशरफ, मौलाना हसीबुर रहेमान, मौलाना रईस, मौलाना मोइन तसेच शहरातील मशीदीतील सर्व मौलाना उपस्थित होते. नगराध्यक्ष दारामोहम्मद, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वकोडे, नगरसेवक आसीफमोहम्मद, शे.सादीक, असदुल्ला खान, योगेश गजरे, गयास शेख, युसुफ खान, अब्दुल मुत्तलीब, गयासुद्दीन काजी, डॉ. नुरमोहम्मद नुरी, कालु पहेलवान, हाफीज मो.अखतर, हाजी मुखतार शे.मोती, फिरोज रोज खान (फोजी), सादीक शेख हमजा तसेच शहरातील हिंदू -मुस्लिम बांधव मोठ्या संख्याने उपस्थित होते. .
खिर्डीत एकात्मतेसाठी प्रार्थना
खिर्डी- गावात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनतंर जगात शांतता नांदू दे, देशात एकात्मता नांदू दे , देश महासत्ता होवू दे’ अशी प्रार्थना करत मुस्लिम समाज बांधवांतर्फे प्रार्थना करण्यात आली. सुन्नी जामा मस्जिद व अहेले सुन्नत वल जमाअत खिर्डी तर्फे सकाळी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवारी सकाळी नऊ वाजता खिर्डी जामा मस्जिद येथून मौलाना सादिक हुसेन यांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात झाली. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत खिर्डी बुद्रुक येथील प्रभारी सरपंच शमीम बी शेख अस्लम, खिर्डी बुद्रुक माजी पोलीस पाटील अरुण पाटील, खिर्डी खुर्द पोलीस पाटील प्रदीप पाटील, शेख अस्लम, शब्बीर शेख, अलताफ बेग, साबीर बेग, जाबीर बेग, पंकज राणे, किरण नेमाडे, गफूर कोळी, घनश्याम पाटील, नीळकंठ बढे, हेमराज किरंगे, दुर्गदास बोंडे, तुकडू बेग, विनोद कोळी, विजय कोळी, उमेश गाढे, याकूब बेग, नईम बेग, आसीफ बेग, शेख काय्युम, अकबर खान, शेख फारूक, शेख शाहिद, जावेद खान व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सहभाग नोंदवला. निंभोर्याचे उपनिरीक्षक योगेश शिंदे, खिर्डी बिटचे भास्कर कुलकर्णी आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.

