लासलगावातील चार बड्या कांदा व्यापार्यांकडे विशेष पथकांच्या धाडी
लासलगाव : लासलगाव येथील चार बड्या कांदा व्यापार्यांकडे विशेष तपासणी पथके धडकल्याने व्यापार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या कांदा व्यापार्यांवर कारवाई सुरू असल्याचे समजते. नफेखोरीच्या उद्देशाने निर्बंध असतानाही व्यापार्यांकडून अतिरिक्त साठा करण्यात आला आहे का? याची पडताळणी करण्यासाठी ही पथके आल्याचे समजते. 500 टन कांदा साठवणूकीच्या मर्यादेबाबत उल्लंघ. झालेले आहे की काय याबाबत आज केंद्र शासनाच्या जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत काम करणार्या विशेष पथकाने धाडी टाकल्या आहेत. देशातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर चढेच राहिल्यामुळे महानगरांमध्ये कांद्याचे प्रतिकिलो दर शंभर रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने 15 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या काळात देशात एक लाख मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.