रावेरचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे वर्दीतला दर्दी माणूस


रावेर : बाबरी मस्जिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय 9 नोव्हेंबर रोजी लागला. देशात या निर्णयाने पोलिस यंत्रणा अंडर प्रेशर असतानाच निकालाच्या दुसर्‍या दिवशी ईद-ए-मिलाद असल्याने आणखी कायदा सुवस्था चोख ठेवण्याचे पोलिसांना आव्हान होते. यासाठी पोलिसांनी शांतता कमेटीच्या बैठक, पोलिसांचे पथसंचलन यासह गावात सौहार्दपूर्ण, शांततामय वातावरण ठेवण्यासाठी कडेकोट कामगिरी पार पाडली. यावेळी संबंधीत पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांवर मोठा ताण असल्यावर सुद्धा, रावेर येथील प्रभारी पोलीस स्टेशन अधिकारी रामदास वाकोडे यांनी सामाजिक मूल्यांचे दर्शन घडवले. याप्रसंगाने रावेरकरांनी पोलिस वर्दीतील दर्दी माणूस पाहून त्यांच्या कार्याला सॅल्यूट केला आहे.शनिवारी ऐतिहासीक अयोध्या निकालाने संपूर्ण देशात मोठी उत्सुकता होती. या दिवशी जल्लोष, फटाके, मिरवणुकीवर बंदी टाकण्यात आली होती. सोशल मिडियामध्ये फडकावू पोस्ट फिरू नये यासाठी पोलिस डोळ्यात तेल ओतून कर्तव्य बजावत होते. पोलिसांनी हिंदू-मुस्लीम बांधवांना सोबत घेवून या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करून रावेरातील एकात्मता देखील दाखवून दिली. या निकालाच्या दुसर्‍या दिवशी ईद ए मिलाद असल्याने पोलिसांनी 48 तास चोख बंदोबस्त सांभाळला,दोन्ही दिवस पोलिसांना सतत कामात झोकून राहावे लागले मात्र इतका ताण असल्यावरही रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी खाकीतील माणुसकी रावेरकरांना दाखवून दिली.

वर्दीतील दर्दी अधिकार्‍याचा प्रत्यय
शहरात रविवारी तीन वेगवगळ्या ठिकाणी एक महिला, प्रौढ इसम व वयोवृद्ध माणसाचा मृत्यू ओढवला. शहरातील कायदा सुव्यस्था सांभाळत असलेल्या रामदास वाकोडे यांना याबाबत माहिती मिळण्यावर छत्रपती शिवाजी चौकात मयत झालेल्या उषाबाई हरीरह महाजन (33) यांच्या परीवाराचे सांत्वन करण्यासाठी जाऊन त्यांच्या परीवाराला धीर देत आर्थिक सहाय्य केले. दारी वर्दीतला अधिकारी आपल्या दुखःात सामील झाला आहे, हे पाहून उषाबाई यांचे पती हरीहर यांना गहिवरून आले. त्यांचे पोलिस निरीक्षक वाकोडे यांनी सांत्वन केले. दुसरी घटना होती कारागीर नगरातील देविदास लक्ष्मण चौधरी (74) यांचेदेखील रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या घरी जाऊन वाकोडे यांनी परीवाराचे सांत्वन करून मदतीचा हात दिला आणि तिसरी घटना होती कुंभारवाड्यातील. तेथील कैलास सीताराम प्रजापती (50) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. तिन्ही घटना एकाच दिवशी घडल्याने वाकोडे यांनी कामात व्यस्त असल्यावर सुद्धा तिन्ही ठिकाणी जाऊन सामाजिक ऋणानुबंध जोपासत पोलिसातही संवेदना असल्याचे व खाकीतही माणुसकी ओतप्रोत भरलेली असल्याचे दाखवून दिल्याने रावेरकरांनी खर्‍या अर्थाने वर्दीतील दर्दी अधिकार्‍याला सॅल्युट ठोकला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !