सर्वसामान्य नागरीकांचे जेवणाचे बजेट बिघडले


अवकाळी आलेल्या पावसाचा पालेभाज्यांना बसला फटका : कांदा पोहोचला तब्ब्ल 70 रुपये किलोंवर

भुसावळ : राज्यासह जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका फळभाज्या, पालेभाज्यांना बसला आहे. बाजारामध्ये फळभाज्या, पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून दैनंदिन जीवनातील भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत यामुळे मात्र सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. एक किलो कांद्याचे भाव तब्बल 70 रुपयांवर पोहोचले आहेत तर दहा रुपये जुडीने मिळणारे कोथिंबर आता 160 रुपये किलोवर पोहोचली आहेत.

जेवणातून कोथिंबीर झाली गायब
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने हाताशी आलेले पीक पाण्यात वाहून गेल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या अवकाळीचा आता शेतकर्‍यांबरोबरच शहरी भागातील नागरीकांनादेखील मोठा फटका बसला आहे. कोथिंबिरीचे दर 40 रुपये पावशेर झाले आहेत तर पावसामुळे कोथिंबिरीचा दर्जादेखील घसरला आहे. यामुळे सध्या सर्वसामान्य कुटुंबांच्या किचनमधून कोथिंबीर गायब झाली आहे. दरम्यान, कांदा 70 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, पालेभाज्यांचा दर्जादेखील पावसामुळे प्रचंड घसरला असून दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यात मेथी 20 ते 30 रुपये पावशेर, प्लॉवर 15 रुपये पाव, मिरची 10 रुपये पावशेर याप्रमाणे अन्य भाज्यांचे दरही कडाडले आहेत. आणखी काही दिवस फळभाज्या, पालेभाज्यांमध्ये आलेली तेजी कायम राहील, असे विक्रेत्यांनी सांगितले. यामुळे मात्र सर्वच गृहिणींचे महिन्याचे बजेट मात्र कोलमडले आहे.

स्वयंपाकातील कांद्याचे प्रमाण कमी केले
कांद्याशिवाय घरामध्ये एकही भाजी करणे शक्य होत नाही परंतु गेल्या काही दिवसांत कांदा 70-80 रुपये किलो दराने विकला जात आहे. यामध्ये आकाराने कमी असलेला कांदादेखील 50 रुपयांच्या खाली मिळत नसल्याने रोजच्या स्वयंपाकातील कांद्याचे प्रमाण कमी केले आहे. इतर फळभाज्या, पालेभाज्यांचे दरदेखील परवडत नाहीत. कुटुंबातील लोकांची संख्या लक्षात घेता अर्धा किलो भाजीदेखील कमी पडते परंतु दर वाढल्याने कडधान्यांवर भागविण्याची वेळ आली. आहे.

फळांचे दरदेखील वाढले
सध्या अवकाळी पावसामुळे शहरामध्ये डेंग्यू, मलेरिया, हिवताप, सर्दी आदी साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या आजारपणा बरोबरच नागरिकांकडून फळांच्या मागणीमध्ये देखील वाढ झाली आहे; परंतु अवकाळी पावसाचा मोठा फटका फळ पिकांनादेखील बसला आहे. यामुळे सफरचंद, डाळिंब, मोसंबी, बोरे, चिक्कू, संत्रा आदी फळांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे देखील गृहिणींच्या बजेटवर परिणाम झाला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !