वरीष्ठांच्या आश्वासनपूर्तीने दर्यापूर ग्रामपंचायतीचे कुलूप उघडले
भुसावळ- तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायत मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यास अकार्यक्षम ठरल्याने संतप्त ग्रामस्थांनी सुमारे दहा दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले होते. अधिकार्यांनी समजूत काढल्यानंतरही ग्रामस्थ लेखी आश्वासन दिल्याशिवाय कुलूप उघडण्यास मज्जाव करीत हाते मात्र मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वरीष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या आश्वासनपूर्तीनंतर पोलिसांच्या उपस्थितीत कुलूप उघडण्यात आले. प्रसंगी प्रशासकीय अधिकार्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात दप्तरांची पाहणी केली.
ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार
दर्यापूर ग्रामस्थांचा पंचायत समिती प्रशासनाविरूध्द लढा गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू आहे. या माध्यमातूनच ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले होते. प्रशासकीय अधिकारी, बीडिओ व त्यांच्या सहकार्यांनी बर्याचवेळा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामपंचायतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याने ग्रामस्थांनी कारवाई करण्यासह तातडीने मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्याचा पवित्रा घेतला होता. ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर गटविकास अधिकारी विलास भटकर यांनी ग्रामसेवक आर.ई.चौधरी यांना दिलेल्या पत्राच्या आधारे पोलिसांत तक्रार केली होती. त्या अनुषंगाने वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक संदीप बोरसे यांनी दर्यापूर येथील ग्रामस्थांना पोलिस स्थानकात बोलावून ग्रामस्थांची समजूत काढत शांत केले. यावेळी ग्रामस्थांनी 2005 ते 2009 काळातील सरपंच वंदना चौधरी, 2009 ते 2014 काळातील सरपंच विशाल शिंदे , 2014 ते 2017 काळातील सरपंच सुनील कोळी व 2017 ते आजपर्यंत कार्यरत वंदना चौधरी तसेच तत्कालीन ग्रामसेवक डी.आर.बारेला यांचा कार्यकाळ 8 वर्षे व ग्रामसेवक आनंदा सुरवाडे यांचा कार्यकाळ दिड वर्षे ग्रामपंचायमध्ये गेला असून या कार्यकाळात 12, 13, 14 व्या वित्त आयोगाचे संपुर्ण दप्तर गहाळ करण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात यावी व संबधीतांवर गुन्हे दाखल करावे तेव्हाच ग्रामपंचायतला लावलेले कुलूप उघडू असा पवित्रा गावातील युवा तरूणांनी घेतला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वरीष्ठांकडून आश्वांसनाची पुर्तता झाल्याने कुलुप उघडण्यात आले.
यांची होती उपस्थिती
कुलूप उघडताना भुसावळ तालुका पंचायत समितीचे अधिकारी राजेंद्र फेगडे, सहाय्यक गटविकास अधिकारी उमेश पाटणकर, ग्रामसेवक आर.ई.चौधरी, सरपंच वंदना चौधरी, वरणगावचे सहाय्यक निरीक्षक संदीप बोरसे, नितीन सोनवणे, जीवराम सुरवाडे यांच्या समक्ष ग्रामपंचायतीचे कुलूप उघडण्यात आले. दरम्यान, ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी कार्यालयात वारंवार पत्रव्यवहार केला मात्र दखल न घेण्यात आल्याने अखेर कुलूप ठोकण्याचा पवित्रा घेण्यात आला, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

