हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेस मुदतवाढ मिळावी
नामदार हरीभाऊ जावळे : केळी करपा रोगासाठी शेतकर्यांना औषध पुरवठ्याचीही केली मागणी
फैजपूर : हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजनेस मुदतवाढ मिळावी आणि केळी पिकांवरील करपा रोगासाठी शेतकर्यांना औषधांचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कृषी शिक्षण व संशोधन परीषद उपाध्यक्ष नामदार हरीभाऊ जावळे यांनी बुधवारी कृषी आयुक्त कार्यालय, पुणे येथे मुख्य सांख्यिकी उदय देशमुख, देवरे यांना केली.
शेतकर्यांना विविध औषधांचा पुरवठा करण्याची मागणी
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन 2019-20 31 ऑक्टोबर 2019 च्या शासन निर्णयानुसार सुरू झाली मात्र प्रीमियम भरण्याचा कालावधी फक्त सात दिवस असल्याने आणि सर्व्हरमध्ये तांत्रीक अडचण निर्माण झाल्यामुळे बरेचसे केळी उत्पादक शेतकरी प्रीमीयम भरण्यापासून वंचित राहिले आहे. शेतकर्यांच्या आलेल्या मागणीवरुन केळी उत्पादक शेतकर्यांना प्रीमीयम भरण्यासाठी 7 ते 8 दिवस मुदत वाढवून देण्यात यावी तसेच निसर्गाच्या असमतोलपणामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी पिकावर करपा रोगाचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव दिसुन येत असून 2011 मधे केंद्र सरकारमार्फत करपा निर्मूलनासाठी 95 कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी अंदाजीत 65 कोटी रुपयांचा निधी अद्यापही राज्य सरकारकडे पडन आहे. या निधीअंतर्गत केळी पिकांवरील करपा निर्मूलनासाठी शेतकर्यांना विविध औषधांचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही जावळे यांनी केली आहे.

