पत्नीचा मृत्यू : पतीसह दोघा भावांविरुद्ध गुन्हा
निंभोरा : बलवाडी येथील विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी पतीसह त्याच्या दोघा भावांविरुद्ध निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ईस्तीखारा बेगम मो.जुनेद मो.जहीर (25) या विवाहितेने माहेरून बुलेट तसेच कार न आणल्याने पतीसह त्याच्या दोघा भावांनी 22 एप्रिल 2018 ते 11 नोव्हेंबर 2019 रोजी दरम्यान वेळोवेळी करमपुर ठाणा सादुल्लानगर व बलवाडी येथे छळ चालवला होता. या छळाला कंटाळून ईस्तीखारा यांनी राहत्या घराच्या छतास असलेल्या पंख्यास ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी या प्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात मयताचा भाऊ शेरेहसून सनाप सैयद व ईल्तीजा हुसेन (रा.मांडवा खुर्द, ता.मनकापुर जि.गौंडा) यांनी फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी तथा पती मो.जुनेद मो.जहीर व त्यांचे भाऊ मो.सगीर अहमद मो.जहीर व मो.मोईद मो.जहीद (करमपूर, ठाणा सादुल्लानगर, ता.उत्तरोला, जि.बलरामपूर (उप्र) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपी मौलाना जुनेद व त्याचा भाऊ मो.सगीर यास अटक करण्यात आली आहे तर अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.
यांनी केली कारवाई
फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक महेश जानकर, फौजदार शिंदे, पोलिस ईश्वर चव्हाण, सुनील वंजारी, सादिख शेख यांनी आरोपींना अटक केली. दरम्यान, मयत विवाहिता सात महिन्यांची गर्भवती असल्याचे समजते. आरोपींची न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी केली.



