उत्तरप्रदेशातील इसमाची फसवणूक : आरोपी जाळ्यात


तक्रारदाराच्या भावाला जामिनावर सोडवण्यासाठी आरोपीने लाखोंत गंडवले : गुन्हे शाखेच्या कारवाईत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

जळगाव : खूनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या संशयीत आरोपीची जामिनावर सुटका करण्याच्या नावाखाली जळगावातील भामट्याने उत्तरप्रदेश राज्यातील इसमाची लाखोत फसवणूक करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीच्या गोपनीय पद्धत्तीने मुसक्या आवळल्या. चंद्रकांत गणपत सुरळकर (36, रा.टॉवर चौक, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

वकीलाचा संदर्भ देत गंडवले
मुक्ताईनगर पोलिसात विशालसिंग अमरनाथसिंग राजपुत (24, रा.बिहटटा पोस्ट – पलथी, तहसिल – फुलपुर जिल्हा आजमगड, उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असून आरोपी सध्या कारागृहात आहे. आरोपीच्या जामिनासाठी त्याचा मोठा भाऊ सौरभ अमरनाथसिंग राजपुत (29 रा.बिहटटा पोस्ट – पलथी, तहसिल – फुलपुर जिल्हा आजमगड, उत्तर प्रदेश) यास नवरात्रीदरम्यान जळगावहुन मोबाईलवर संशयीत आरोपी चंद्रकांत गणपत सुरळकर याने फोन करीत आपण देशपांडे वकीलांकडे कामाला असून तुमच्या भावाला जामिन मिळवून देण्यासाठी 50 हजारांची मागणी केली. तक्रारदारान आशेपोटी 27 सप्टेंबर 2019 रोजी आरोपीला रक्कम दिल्यानंतर 25 ऑक्टोबर 19 रोजी पुन्हा 30 हजारांची मागणी करण्यात आल्यानंतर 26 रोजी आरोपीच्या खात्यावर रक्कम टाकण्यात आली तर 3 नोव्हेंबर रोजी पुन्हा आरोपीने 25 हजारांची मागणी केल्यानंतर 8 नोव्हेंबर 2019 रोजी आरोपीला प्रत्यक्ष तक्रारदाराने रक्कम आणून दिली. 6 नोव्हेंबरपासून तक्रारदार भावाच्या जामिनासाठी जळगावच्या विसावा लॉजमध्ये थांबून होता तर 12 नोव्हेंबर रोजी दुपारी चंद्रकांत सुरळकर यांनी सॉल्व्हन्सीसाठी 60 हजारांची मागणी करीत रक्कम न दिल्यास लखनऊ न जावू देण्याची धमकी दिल्यानंतर तक्रारदाराने पुन्हा पाच हजार रुपये दिले तर आरोपीने 8 नोव्हेंबर रोजीदेखील जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले आहे. आरोपी फसवणूक करीत असल्याचे सौरभ राजपुत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली.

अखेर आरोपीच्या मुसक्या आवळल्या
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, उपनिरीक्षक सुधाकर लहारे, एएसआय अशोक महाजन, हवालदार रवींद्र पाटील, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, दीपक पाटील, दादाभाऊ पाटील, विनोंद सं.पाटील, अनिल देशमुख, पल्लवी मोरे तसेच सहाय्यक फौजदार विनयकुमार देसले, दर्शन ढाकणे आदींच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास अटक करण्यात आली व त्यास न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

आरोपीविरुद्ध खुनाचा खून
सूत्रांच्या माहितीनुसार, अटकेतील आरोपीविरुद्ध यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असून तो एक वर्ष कारागृहात राहिल्याची माहिती आहे तर तो कुठल्याही वकीलाकडे कामाला नसल्याचे सांगण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !